वॉशिंग्टन : गाझामधील युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हमासने शस्त्रे खाली ठेवावीत, अशी सूचना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंन्जामिन नेतान्याहू यांनी प्लोरिडामध्ये ट्रम्प यांची भेट घेऊन गाझा युद्धबंदी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा केली. हा दुसरा टप्पा अधिक गुंतगुंतीचा असल्याने यासाठी पूर्वनियोजन आवश्यक असणार आहे. दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे न झाल्यास युद्धबंदी करारच धोक्यात येण्याचा धोका आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये हमासचे निःशस्त्रीकरण आवश्यक आहे, याची आठवण नेतान्याहू यांनी करून दिली. जर हमासने तातडीने निःशस्त्रीरण केले नाही, तर इस्रायलचे सैन्य गाझामधून माघार घेऊ शकणार नाही, असेही नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितले. जर हमासने शस्त्रे खाली ठेवली नाही तर काय? असे विचारले असता ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. शस्त्रे खाली ठेवली नाही तर हमासला नरकात जावे लागेल, असे ते म्हणाले. हमासला उद्देशून ट्रम्प यांनी यापुर्वीदेखील असाच इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने १७ नोव्हेंबर रोजी केलेल्या ठरावानुसार दुसऱ्या टप्प्यात गाझामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांना तैनात केले जाणे देखीलअभिप्रेत आहे. याशिवाय गाझामध्ये हंगामी प्रसासनाची सत्ता प्रस्थापित केली जाणे देखील अपेक्षित आहे. यासंदर्भात देखील ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात चर्चा झाली. नेतान्याहू यांचे कौतुक युद्धाच्यावेळी इस्रायलचे समर्थपणे नेतृत्व केल्याबद्दल ट्रम्प यांनी नेतान्याहू यांचे कौतुक केले. जर या कठीण प्रसंगी नेतान्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान नसते आणि अगदी चुकीची व्यक्ती इस्रायलची पंतप्रधान असती, तर इस्रायलचे अस्तित्वच राहू शकले नसते, असे ट्रम्प म्हणाले. मार-ए-लागो येथे ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात झालेली ही पाचवी चर्चा होती. गाझामधील हंगामी प्रशासनाच्या स्थापनेविषयीचा आराखडा येत्या काही दिवसात निश्चित केला जाईल आणि जानेवारीमध्ये तो जाहीर केला जाईल. त्यासाठी पुन्हा एकदा नेतान्याहू यांच्याशी सविस्तर चर्चा व्हायला लागेल, असेही ट्रम्प म्हणाले.