डोनाल्ड ट्रंप यांचा हमासला 3-4 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा… गंभीर परिणामांची धमकी

Donald Trump on Hamas News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हमासला गाझा शांतता प्रस्ताव स्वीकारण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. हा प्रस्ताव न स्वीकारल्यास हमासला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रंप यांनी दिला. गाझामधील शांततेसाठी ट्रंप यांनी २० सूत्री योजना तयार केली असून, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्याला संमती दर्शवली आहे. आता हमासच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
व्हाइट हाऊसबाहेर पत्रकारांशी बोलताना ट्रंप म्हणाले, “इस्रायल आणि अरब देशांनी ही शांतता योजना मान्य केली आहे. आता हमासने यावर निर्णय घ्यावा. जर त्यांनी हा प्रस्ताव नाकारला, तर परिणाम अत्यंत दुखद होतील.” या योजनेवर अधिक चर्चेसाठी फारसा वाव नसल्याचे सांगत त्यांनी लवकरात लवकर याची अंमलबजावणी करण्यावर भर दिला.
“सात युद्धे थांबवली”
ट्रंप यांनी दावा केला की, त्यांच्या प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत सात युद्धे थांबवली आहेत. “हे अभूतपूर्व आहे. असं यापूर्वी कोणीही केलेलं नाही,” असं ते म्हणाले. नोबेल पुरस्काराबाबत विचारले असता त्यांनी उपरोधिकपणे सांगितले, “नोबेल मला मिळणार नाही. ते कदाचित एखाद्या अशा व्यक्तीला देण्यात येईल ज्याने ‘डोनाल्ड ट्रंप यांच्या मेंदू’वर पुस्तक लिहिलं असेल. पण मला पुरस्कार नको, मी माझ्या देशासाठी हे यश मिळवू इच्छितो.”
भारत-पाकिस्तान विवादाचा उल्लेख –
ट्रंप यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील “मोठा” विवाद सोडवल्याचा दावा केला. त्यांच्या प्रशासनाने आतापर्यंत सात युद्धे संपवली असून, भारत-पाकिस्तान वाद हा त्यापैकी सर्वात मोठा होता, असं ते म्हणाले. तसेच, गाझा संघर्ष संपवण्यासाठी तयार केलेल्या योजनेला अरब आणि मुस्लिम देशांनीही पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले.
हमासवर दबाव वाढला –
गाझामध्ये गेल्या दोन वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. ट्रंप यांच्या २० सूत्री योजनेमुळे शांततेची आशा निर्माण झाली आहे. मात्र, हमासने ही योजना स्वीकारली नाही, तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा ट्रंप यांनी दिला आहे.





