US : भेटवस्तूंची माहिती ट्रम्प यांनी दडवली; अमेरिकेच्या संसदेच्या कमिटीने केला आरोप

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष असताना अध्यक्षांच्या कुटुंबियांना परदेशी पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती देण्यात डोनाल्ड ट्रम्प यांना अपयश आले आहे. एकूण 2 लाख 50 हजार डॉलरच्या भेटवस्तूंचा तपशील ट्रम्प यांच्याकडून मिळू शकलेला नाही. यामध्ये भारतीय नेत्यांकडून, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 47 हजार डॉलरच्या भेटवस्तूंचा समावेश आहे. अमेरिकेच्या संसदेच्या कमिटीने हा आरोप केला आहे.
“सौदी स्वोर्डस इंडियन ज्वेलरी ऍन्ड लार्जर दॅन लाइफ सल्वादोरन पोट्रेट ऑफ डोनाल्ड ट्रम्प’ असे या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अहवालाचे शिर्षक आहे. या अहवालामध्ये ट्रम्प प्रसासनाकडून हिशेब न मिळालेल्या परदेशी पाहुण्यांच्या भेटवस्तूंची माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून मागवण्यात आलेल्या भेटवस्तूंबाबतची प्राथमिक माहिती या अहवालामध्ये सादर करण्यात आली आहे. अमेरिकेच्या “फॉरेन गिफ्टस ऍन्ड डेकोरेशन ऍक्ट’नुसार ही माहिती ट्रम्प प्रशासनाकडून मागवण्यात आली होती.
रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प 2017 पासून 2021 पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष होते. सत्तांतर झाल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिशेब न मिळालेल्या भेटवस्तूंचा तपास करायला सुरुवात केली. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांना सुमारे 100 मौल्यवान भेटवस्तूंचा तपशील देता आलेले नाही, असे या कमिटीचे अध्यक्ष जेमी रस्कीन यांनी म्हटले आहे.
भारतीय नेत्यांकडून मिळालेल्या 17 मौल्यवान भेटवस्तूंची तर नोंदही झालेली नाही. यात योगी आदित्यनाथ यांनी दिलेली 8,500 डॉलरची फुलदाणी, 4,600 डॉलरची ताजमहालची प्रतिकृती, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेला 6,600 डॉलर किंमतीचा भारतीय गालिचाचा समावेश आहे, या भेटवस्तूंची अंदाजे 47 हजार डॉलर आहे, असे या अहवालात म्हटले आहे.





