Donald Trump : चीनबरोबरच्या व्यापारी कराराला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 90 दिवसांची मुदतवाढ

वॉशिंग्टन : चीनबरोबर व्यापारी करार करण्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी ९० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मात्र यामुळे दोन्ही आर्थिक महासत्तांच्या प्रगतीचा वेग मंदावणार आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये चीनबरोबरच्या व्यापारी कराराला आपण ९० दिवसांची मुदतवाढ दिल्याचे म्हटले आहे. या करारातील अन्य तपशील पूर्वी ठरल्यानुसारच असणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
चीन बरोबरच्या व्यापार कराराची निश्चिती करण्यासाठी ठरवलेली मुदत मंगळवारी मध्यरात्री समाप्त होणार होती. त्यापुर्वीच ट्रम्प यांनी ही मुदतवाढीची घोषणा केली आहे. जर हा करार झाला असता, तर अमेरिकेकडून चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवरील आयात शुल्क सध्याच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले असते. तर याला प्रत्युत्तर म्हणून चीनकडूनही अमेरिकेतून चीनमध्ये आयात होणाऱ्या उत्पादनांवर तेवढेच आयात शुल्क लावले गेले असते.
आता व्यापार कराराला मुदतवाढ दिली गेल्यामुळे दोन्ही देश आपापसातील मतभेद मिटवण्यासाठी अधिक काम करू शकतील. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात या वर्षाच्या अखेरीस थेट चर्चा होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. कराराला मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचे चीनमध्ये काम करणाऱ्या अमेरिकेतल्या कंपन्यांनीही स्वागत केले आहे.
जपान, युरोपीय संघ आणि अन्य देशांकडून अमेरिकेने लादलेले आयात शुल्क मान्य करून व्यापार करार करण्यातच समाधान मानले आहे. हे आयात शुल्क एकेकाळी मान्य करणे अशक्य असल्याचे मानणारे देश आता अमेरिकेपुढे नमते घेत आहेत. मात्र चीनबरोबरच्या वाटाघाटी अजूनही सुरू आहेत.





