Donald Trump: एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणला सतत इशारे देत असल्यामुळे मध्य-पूर्वेतील तणाव वाढत आहे, तर दुसरीकडे वॉल स्ट्रीटमधील घडामोडींमुळे त्यांना आर्थिक आणि राजकीय चौकशीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ३,७०० हून अधिक शेअर व्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे. या मोठ्या संख्येतील व्यवहारांमुळे बाजार तज्ज्ञ आणि नियामक संस्थांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अहवालानुसार, ट्रम्प यांनी या कालावधीत दररोज सरासरी ४० पेक्षा अधिक व्यवहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात प्रथम हे आर्थिक व्यवहार समोर आले असून, जानेवारी ते मार्चदरम्यान अमेरिकेतील विविध मोठ्या टेक, वित्त, एरोस्पेस आणि मीडिया कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग झाल्याचे दिसून आले. यापूर्वीच्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. २०२५ च्या शेवटच्या तीन महिन्यांत सुमारे ३८० व्यवहारांची नोंद होती, तर या वर्षाच्या सुरुवातीला हा आकडा हजारोंच्या घरात गेला. ( Donald Trump ) बाजार तज्ज्ञांनी या व्यवहारांच्या प्रमाणावर आश्चर्य व्यक्त केले आहे. टटल कॅपिटल मॅनेजमेंटचे सीईओ मॅथ्यू टटल यांच्या मते, ही संख्या एखाद्या मोठ्या हेज फंडसारखी वाटते. तर वेल्थ अलायन्सचे अध्यक्ष एरिक डिटन यांनीही हे सामान्य राजकीय किंवा व्यावसायिक वर्तन नसल्याचे मत व्यक्त केले आहे. Donald Trump Donald Trump: अहवालात नमूद केलेल्या व्यवहारांमध्ये एनव्हिडिया, मायक्रोसॉफ्ट, बोईंग, ओरॅकल, कॉस्टको, ॲमेझॉन, मेटा, उबर, ईबे, एटी अँड टी आणि इतर मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. काही व्यवहार प्रत्येकी किमान १ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः १० फेब्रुवारी रोजी मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि ॲमेझॉनमधील ५ ते २५ दशलक्ष डॉलर्सच्या शेअर्सची विक्री झाल्याचेही अहवालात नमूद आहे. या खुलाशांमुळे ट्रम्प यांच्या व्यवसायिक व्यवहारांवर पुन्हा एकदा राजकीय टीका वाढली आहे. अनेक कंपन्या अशा क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत ज्या अमेरिकी सरकारच्या धोरणांवर, नियमांवर आणि भू-राजकीय निर्णयांवर थेट अवलंबून असतात. (Donald Trump) उदाहरणार्थ, एनव्हिडियाला चीनमध्ये एआय चिप्स निर्यातीसाठी परवानगी आवश्यक असते, तर बोईंगसारख्या कंपन्या संरक्षण आणि सरकारी करारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. तसेच मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आणि मेटा यांसारख्या कंपन्या एआय आणि अँटीट्रस्ट चौकशांमुळे सतत सरकारी लक्षात असतात. टीकाकारांचे म्हणणे आहे की, जरी कायदेशीर उल्लंघन सिद्ध झाले नसले तरी अशा प्रकारच्या व्यवहारांमुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होऊ शकतो. तसेच ट्रम्प यांनी त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांना स्वतंत्र ‘ब्लाइंड ट्रस्ट’मध्ये हस्तांतरित न केल्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी तेल आणि शेअर फ्युचर्स बाजारातही अशाच प्रकारच्या हालचालींचे संकेत मिळाले होते. इराणसंदर्भातील शांतता चर्चेच्या शक्यतेवर ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर तेलाच्या किमतीत घसरण आणि अमेरिकन शेअर बाजारात तेजी दिसून आली होती.