44 कोटी भरा अन् अमेरिकेचे नागरिकत्व मिळवा, ट्रम्प यांनी केली ‘गोल्ड कार्ड’ची घोषणा; भारतीयांवर काय परिणाम होणार?

USA Gold Card | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांच्याबाबतीत कठोर पाऊल उचलले आहे. बेकायदेशीररित्या अमेरिकेत वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी पाठवले जात आहे. मात्र, एकीकडे बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवत असताना आता ट्रम्प यांनी नवीन व्हिसा प्रोग्रामची घोषणा केली आहे.
ट्रम्प यांनी ‘गोल्ड कार्ड’ नावाने व्हिसा प्रोग्रामची घोषणा केली असून, या अंतर्गत आता अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ट्रम्प यांनी ‘गोल्ड कार्ड’ला EB-5 व्हिसा प्रोग्रामचा पर्याय असल्याचे म्हटले आहे. तसेच, भविष्यात 10 लाख गोल्ड कार्डची विक्री करण्याचा उद्देश आहे.
सध्या अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी EB-5 व्हिसा प्रोग्राम हा सर्वात सोपा मार्ग आहे. हा व्हिसा प्राप्त करण्यासाठी 1 मिलियन डॉलर (जवळपास 8.75 कोटी रुपये) एवढी रक्कम द्यावी लागते. मात्र, ‘गोल्ड कार्ड’ची रक्कम यापेक्षा 5 पट अधिक आहे. 5 मिलियन डॉलर (जवळपास 44 कोटी रुपये) खर्चून गोल्ड कार्ड प्राप्त करता येणार आहे.
या कार्डची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की, ‘या व्हिसा कार्डच्या माध्यमातून अमेरिकेच्या नागरिकत्व प्राप्त करण्याचा मार्ग उपलब्ध होईल. हे कार्ड खरेदी करून लोकं अमेरिकेत येतील व जास्त कर भरतील. याद्वारे राष्ट्रीय कर्ज फेडण्सास मदत होईल.’ तसेच, ही योजना यशस्वी होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
सध्या अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्य करण्यासाठी ग्रीन कार्ड गरजेचे असते. यासाठी EB-1, EB-2, EB-3, EB-4 आणि EB-5 व्हिसा प्रोग्राम आहेत. अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी भारतीय प्रामुख्याने EB-5 व्हिसा प्रोग्राम असतात. त्यामुळे ट्रम्प सरकारने EB-5 व्हिसा प्रोग्राम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास ‘गोल्ड कार्ड’साठी भारतीय नागरिकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे या नवीन व्हिसा प्रोग्रामचा सर्वाधिक फायदा श्रीमंतानाच होण्याची शक्यता अधिक आहे.





