Donald Trump : अमेरिकेने आतापर्यंत इराणची 9 जहाजे बुडवल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला आहे. बुडवण्यात आलेल्या या जहाजांपैकी काही जहाजे मोठी आणि प्रभावी होती. इराणच्या नौदलातील सर्वात मोठ्या जहाजांपैकी होती, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणच्या नौदलाचे मुख्यालय देखील एका अन्य हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. चाबहार बंदराजवळ नांगर टाकून उभ्या असलेल्या इराणच्या जमरान श्रेणीच्या विनाशिकेवर अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी यशस्वी मारा केला असल्याचे यूएस सेंट्रल कमांडने म्हटले होते. त्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी ९ जहाजे बुडवल्याचा दावा केला आहे. हे जहाज सध्या ओमानच्या आखाताजवळ समुद्रात बुडत असल्याचे यूएस सेंट्रल कमांडने अलिकडेच म्हटले होते. पण या जहाजावरच्या कारवाईबाबत सेंट्रल कमांडने अन्य कोणताही तपशील दिला नाही. परंतु इराणी सैन्याने शस्त्रे टाकण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. आतापर्यंत इराणची ९ जहाजे अमेरिकेने बुडवली आहेत. लवकरच इतर जहाजेही समुद्राच्या तळाशी बुडाली असतील. नौदल मुख्यालय देखील उद्ध्वस्त केले गेले आहे. लष्करी हार्डवेअरच्या नुकसानीबरोबर इराणचे किमान 48 लष्करी नेते अमेरिका-इस्रायली बॉम्बहल्ल्यात मारले गेले आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. होर्मूझ समुद्रधुनीतल्या जहाजांवर इराणचे हल्ले होर्मूझ समुद्रधुनीतल्या तीन जहाजांवर इराणने हल्ले केले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये ओमानच्या किनाऱ्याजवळ असलेल्या एका जहाजावर एक क्षेपणास्त्र धडकले. यामुळे जहाजाच्या इंजिन रूमला आग लागली होती. दुसऱ्या जहाजालाही असेच क्षेपणास्त्राने लक्ष्य केले गेले.पण या जहाजाने आपला प्रवास सुरू ठेवला. अमिरातीतील शारजा शहरापासून ३५ सागरी मैल अंतरावर आणखी एका जहाजाजवळ क्षेपणास्त्राचा हल्ला झाला. या जहाजावरील सर्व ३५ कर्मचारी सुखरुप असल्याचे सागरी मार्ग देखरेख एजन्सीने म्हटले आहे.