Gram Panchayat Results 2021 : महाविकास आघाडीचे वर्चस्व

मुंबई, दि.18 -राज्यभरातील 12 हजार 711 ग्रामंपचायतींच्या निवडणुकांमध्ये सत्तारूढ महाविकास आघाडीने वर्चस्व राखले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने मोठ्या विजयाचा दावा केला. तर, भाजपकडून क्रमांक 1 चा पक्ष ठरल्याचा प्रतिदावा करण्यात आला.

निवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या ग्रामपंचायतींमधील 1 लाख 25 हजार 709 जागांसाठीची मतमोजणी सोमवारी झाली. ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. मात्र, त्यांना मोठे महत्व असल्याने राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते आपले पॅनेल उभे करतात. त्यापार्श्‍वभूमीवर, निवडणुकांच्या निकालांबाबत राजकीय पक्षांकडून वेगवेगळे दावे करण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून जनतेने महाविकास आघाडीवर विश्‍वास दाखवल्याच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आल्या. कॉंग्रेसने तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 80 टक्के जागा आल्याचा दावा केला. त्याउलट, प्रत्येक पक्षाच्या वैयक्तिक कामगिरीचा विचार करता आम्ही खूप पुढे राहिलो. त्यातून जनतेच्या मनात महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल रोष असल्याचे सूचित झाले, अशा प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून देण्यात आल्या.

ग्रामपंचायत निवडणुकांनी सर्वच पक्षांच्या काही बड्या नेत्यांना हादरा दिला. लातूर जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत आम आदमी पक्षाच्या (आप) ताब्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकांतील ठळक घडामोडींपैकी तो एक निकाल ठरला. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या. मात्र, त्यातील 1 हजार 523 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे इतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी मतदान झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.