Dollar Vs Rupee: कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे परकीय भांडवल परत जात असल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का बसला. त्यामुळे मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 41 पैशांनी घसरून 94.56 रुपये प्रति डॉलर झाला. चलन व्यापार्यांच्या मते, चालू खात्यातील तूट वाढण्याची शक्यता आणि अस्थिर भांडवली प्रवाह लक्षात घेता रुपया आधीच कमकुवत झाला आहे. शिवाय, परकीय निधी परत जात आहे. या वर्षात आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 19 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. सोमवारी, रुपया केवळ एका पैशाच्या वाढीसह डॉलरच्या तुलनेत 94.15 वर बंद झाला होता. केअरएज रेटिंग्सच्या मुख्य अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा म्हणाल्या, रुपयावरील मुख्य दबाव हा कमकुवत भांडवली गुंतवणुकीमुळे आहे. निव्वळ थेट परकीय गुंतवणूक कमी झाली आहे, तर वाढलेली जागतिक अनिश्चितता, तुलनेने उच्च इक्विटी मूल्यांकन यामुळे पादेशी गुंतवणूकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक 0.24 टक्क्यांनी वाढून 98.73 वर पोहोचला. क्रूडचा दर वायदे बाजारात 2.62 टक्क्यांनी वाढून ते प्रति बॅरल 111.07 डॉलरवर गेला होता. पश्चिम आशियातील संघर्षाबाबत बरीच अनिश्चितता आहे. जरी नजीकच्या काळात हा संघर्ष कमी झाला, तरी आर्थिक वर्ष 2027 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती सरासरी 85-90 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल राहतील अशी अपेक्षा आहे. या आधारभूत पातळीनुसार, रुपया आर्थिक वर्ष 2027 मध्ये सरासरी 92-93 च्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे, असे सिन्हा म्हणाल्या. देशांतर्गत शेअर बाजारात, सेन्सेक्स 416.72 अंकांनी घसरून 76,886.91 वर स्थिरावला, तर निफ्टी 97 अंकांनी घसरून 23,995.70 वर आला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी 1,151.48 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केली. आखातातील संघर्ष वाढल्यास आणि कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढल्यास, रुपयावर आणखी दबाव येईल, असे सिन्हा म्हणाल्या.