Dollar Vs Rupee: रुपयाची रेकॉर्डतोड घसरण! अमेरिका-भारत व्यापार तणावाने 88.47 वर कोसळला

Dollar Vs Rupee: भारत अमेरिकेदरम्यान व्यापार तणाव आणखी पूर्णपणे निवललला नाही. त्यामुळे रुपयाच्या मूल्यावरील दबाव कायम आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी रुपयाचा भाव 36 पैशांनी कोसळून 88.47 रुपये प्रति डॉलर या ऐतिहासिक निचांकि पातळीवर गेला. रिझर्व बँक हस्तक्षेप करीत असूनही गेल्या अनेक दिवसापासून रुपयाचा भाव कमी पातळीवर आहे.
सध्या खनिज तेलाचे दर उच्च पातळीवर आहेत. त्याचबरोबर परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून विक्री करीत आहेत. अशा परिस्थितीत सध्याच्या भावावर आयातदार डॉलरची मागणी वाढवीत आहेत. त्यामुळे रुपयाचा भाव कमी होत असल्याचे सांगण्यात येते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देश पुन्हा व्यापारासंदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र तरीही जागतिक चलन बाजारात डॉलर वधारत आहे. विविध कारणामुळे डॉलरची मागणी वाढत असल्यामुळे रुपयावर याचा दबाव येत आहे.
पुढील आठवड्यात अमेरिकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्या धोरणाकडे जगातील चलन बाजारातील व्यापार्यांचे लक्ष आहे. या धोरणानंतर जागतिक चलन बाजाराला काही प्रमाणात दिशा मिळू शकण्याची शक्यता आहे. दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत असून बुधवारी या गुंतवणूकदारांनी 115 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
मात्र भारताकडे सध्या जवळजवळ सातशे अब्ज डॉलरचा परकीय चलनाचा साठा आहे. त्यामुळे भारताला किमान एक वर्षभर तरी या आघाडीवर जास्त चिंता करण्याची गरज नाही. त्याचबरोबर भारत परकीय चलनाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक देशाबरोबर व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने नमूद केले आहे.



