Dollar Vs Rupee: जागतिक बाजारातील घडामोडी आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून, ३० एप्रिल रोजी रुपयाने ९५.३५ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीला स्पर्श केला आहे. या वर्षात रुपयाच्या मूल्यात तब्बल ६ टक्क्यांची घसरण झाली असून, याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसह सर्वसामान्यांच्या खिशावरही होणार आहे. प्रामुख्याने विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेली मोठ्या प्रमाणावरील विक्री आणि डॉलरची वाढती ताकद यामुळे रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. क्रूड ऑईल आणि इराण-अमेरिका संघर्षाचा फटका – मध्यपूर्वेतील तणाव, विशेषतः अमेरिका आणि इरान यांच्यातील संभाव्य संघर्षामुळे डॉलर अधिक मजबूत झाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी मध्यपूर्वेतील युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून, ब्रेंट क्रूड आता प्रति बॅरल १२६ डॉलरवर पोहोचले आहे. हेही वाचा – खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन वाढणार? 1,000 वरून 7,500 रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव चर्चेत भारत आपल्या गरजेच्या ९० टक्के तेल आयात करत असल्याने कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारताच्या चालू खात्यातील तुटीवर परिणाम करत असून रुपयाला कमकुवत करत आहेत. महागाईचा सर्वसामान्यांना फटका – रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात महागणार असून, इंधन, स्वयंपाकाचे तेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, चलनातील या घसरणीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडू शकते. आयातीवर आधारित उत्पादनांचे दर वाढल्यामुळे महागाईचा सामना करावा लागणार आहे.