Dollar Vs Rupees: आखातातील नव्याने सुरू झालेले संघर्षामुळे गुंतवणूकदार जोखमीच्या मालमत्तांमधून माघार घेत असल्याने, मंगळवारी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 2 पैशांनी घसरून 95.25 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. प्रति बॅरल 110 अमेरिकी डॉलरच्या जवळपास असलेले ब्रेंट तेल, भारतासारख्या तेल-आयात करणार्या अर्थव्यवस्थांवर दबाव कायम ठेवत आहे. भू-राजकीय अनिश्चिततेमुळे परकीय भांडवल परत जात आहे. सोमवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 39 पैशांनी घसरून 95.23 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. आयातदारांकडून डॉलरची मागणी आणि अमेरिका व इराणमधील सुरू असलेला भू-राजकीय तणाव देखील रुपयावर दबाव आणू शकतो. तथापि, आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे रुपयाला खालच्या पातळीवर आधार मिळू शकतो. दरम्यान, सहा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर इंडेक्स 0.10 टक्क्यांनी वाढून 98.47 वर ट्रेड करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीच्या फुजैरा या बंदर शहरावरील हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले. महागाई 6.9 टक्क्यापर्यंत वाढणार – मध्य पूर्वेतील संकटामुळे भारताची जीडीपी वाढ 0.6 टक्क्यांनी कमी होऊन 6.3 टक्क्यांवर येईल आणि चालू आर्थिक वर्षात महागाईतही लक्षणीय वाढ होईल, अशी माहिती एडीबीचे मुख्य अर्थतज्ज्ञ अल्बर्ट पार्क यांनी दिली. एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) अगोदर देशांतर्गत मागणीमुळे जीडीपी वाढ चालू आर्थिक वर्षात 6.9 टक्क्यांवर मजबूत राहील आणि पुढील आर्थिक वर्षात ती 7.3 टक्क्यांपर्यंत वाढेल असे म्हटले होते. चालू आर्थिक वर्षासाठी 4.5 टक्के महागाईचा अंदाज वर्तवला होता. आता बँकेने म्हटले आहे की, यावर्षी महागाई 2.4 टक्क्यांनी वाढून 6.9 टक्क्यांवर जाईल. कारण भारत आयात केलेल्या तेल आणि वायूवर अधिक अवलंबून आहे.