नवी दिल्ली – अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची शक्यता मावळल्यामुळे डॉलर बळकट होत आहे. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्ध संपविण्यासाठी अमेरिका प्रयत्न वाढविणार आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे आकर्षण कमी झाले आहे. अशा परिस्थितीत या दोन धातूच्या दरात वेगाने घट होत आहे. दिल्ली सराफात गुरुवारी सोन्याचा दर 600 रुपयांनी घसरून 1 लाख 26 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दरही 2,000 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 58 हजार रुपये प्रति किलो झाला. एचडीएफसी सेक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, सोने आणि चांदीचे दर वाढण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदार विक्री करून नफा काढून घेत असल्याचे वातावरण आहे. शटडाऊन मुळे ऑक्टोबर महिन्यातील बेरोजगारीची आकडेवारी अमेरिकेतील कामगार विभाग जाहीर करणार नाही. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व व्याजदर कपातीचा निर्णय घेऊ शकणार नाही. या कारणामुळे डॉलर बळकट होत आहे. त्या तुलनेत सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. डॉलर वधारत असल्यामुळे जगातील सहा महत्त्वाच्या चलनेच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स 0.03% वाढून 100.26 अंकावर गेला आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 4,060 डॉलर आणि चांदीचा दर 1.22 टक्क्यांनी कमी होऊन 50.73 डॉलर प्रति औंसापर्यंत गेला.