आरबीआयकडून डॉलर खरेदी

रुपया अधिक बळकट होऊ नये म्हणून हस्तक्षेप
मुंबई : भारतातील कंपन्यांत थेट परकीय गुंतवणूक वाढू लागली आहे. परकीय चलन भारतात येत असल्यामुळे रुपया बळकट होत आहे. निर्यातीच्या दृष्टिकोनातून रुपया अधिक बळकट होणे योग्य नाही, ही बाब ध्यानात घेऊन रुपयाचे मूल्य कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बरीच डॉलर खरेदी केली आहे.
गेल्या आठवड्यात रुपयाचे मूल्य बरेच वाढले होते. मात्र सोमवारपासून रिझर्व्ह बॅंकेने हस्तक्षेप सुरू केल्यापासून आता रुपया बराच कमकुवत झाला आहे. सोमवारी रुपयाचे मूल्य दोन पैशांनी कमी झाले होते. मंगळवारीही रुपयाचे मूल्य तब्बल 25 पैशांनी कमी झाले आणि रुपयाचा भाव 74.93 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. रुपया अधिक मजबूत झाल्यामुळे निर्यात परवडत नाही अशी तक्रार निर्यातदारांनी केली होती. सर्व बाबींचा सर्वसमावेशक विचार करून रिझर्व्ह बॅंकेने हस्तक्षेप केला असल्याचे बोलले जाते.
रुपयाचे मूल्य गरजेपेक्षा जास्त बळकट किंवा कमकुवत झाल्यानंतर ते स्थिर करण्यासाठी बॅंक हस्तक्षेप करीत असते. भारताकडे परकीय चलनाचा 507 अब्ज डॉलरचा साठा आहे. अशा अवस्थेत रुपया बळकट होणे व्यापाराच्या दृष्टिकोनातून सोयीचे नाही. आता रिझर्व्ह बॅंक रुपयाचे मूल्य 74 ते 75 रुपये प्रति डॉलर दरम्यान ठेवण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे बोलले जाते.
निर्देशांकांची आगेकूच
दरम्यान, अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येण्याची चिन्हे दृष्टिपथात आहेत. त्यामुळे शेअरबाजारात खरेदी चालूच आहे. मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 187 अंकांनी म्हणजे 0.51 टक्क्यांनी वाढून 36,674 अंकांवर बंद जागा. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 36 अंकांनी वाढून 10,799 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग, वित्त, वाहन क्षेत्राचे निर्देशांक दोन टक्क्यापर्यंत वाढले तर तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, दूरसंचार क्षेत्राचे निर्देशांक 2.5 टक्क्यापर्यंत कमी झाले.





