मुंबई : साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर चौकशी योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांनी आजपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातारा जिल्हातील फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू झाल्याने राज्यभर वैद्यकीय क्षेत्रात संताप उसळला आहे. या मृत्यूच्या तपासात चौकशी धीम्या गतीने व चुकीच्या दिशेने चालल्याचा आरोप डॉक्टर संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांनी एकत्र येऊन मेणबत्ती मोर्चा काढत या घटनेचा निषेध केला. या संघटनांमध्ये माई (महिला डॉक्टर संघटना), अस्म (आंतरवासिता डॉक्टर संघटना), एमएसआरडीए (वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटना) या प्रमुख संघटनांचा समावेश होता.