नवी दिल्ली – राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी १९ वर्षीय मुलीच्या पोटातील तब्बल १० किलो वजनाचा ट्यूमर काढण्यात यश मिळवले आहे. गेल्या पाच वर्षांपासून तिच्या पोटात वाढत असलेल्या गाठीने अखेर प्रचंड आकार घेतला होता. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे मुलीला नवजीवन मिळाले असून, ही कामगिरी वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक ठरली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ३० x २० x २० सेंमी माप आणि १०.१ किलो वजनाचा रेअर रेट्रोपेरिटोनियल ट्यूमर रुग्णाच्या शरीरातील प्रमुख अवयवांवर आणि रक्तवाहिन्यांवर दाब निर्माण करत होता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसमोर गंभीर आव्हान बनली होती. तथापि, डॉक्टरांच्या टीमने अत्यंत कुशलतेने आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय हा ट्यूमर यशस्वीपणे काढून टाकला. या जटिल ऑपरेशनमध्ये ॲनेस्थेशियोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, सीटीव्हीएस तज्ज्ञ, ओटी आणि आयसीयू कर्मचारी तसेच सहाय्यक वैद्यकीय टीम सहभागी होती. सर्वांचे एकच उद्दिष्ट होते ते म्हणजे रुग्णाचे अवयव पूर्ववत कार्य करू लागावेत आणि शरीर लवकर पुनर्प्राप्त व्हावे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला विशेष देखरेखेखाली ठेवण्यात आले. काही दिवसांच्या उपचारांनंतर ती पूर्णपणे बरी झाली असून, चांगल्या प्रकृतीत तिला घरी सोडण्यात आले आहे. ही यशस्वी शस्त्रक्रिया सफदरजंग रुग्णालयाच्या कौशल्य, टीमवर्क आणि जीवनरक्षक सेवेच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही अवघड शस्त्रक्रिया रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप बंसल, प्राचार्या डॉ. गीतिका खन्ना, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चारु बांबा आणि एनेस्थेशिया विभाग प्रमुख डॉ. कविता शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तर सर्जरी युनिट एस-६ च्या प्रो. डॉ. शिवानी बी. परुथी यांच्या मार्गदर्शनाखालील तज्ज्ञ सर्जनांच्या टीमने हे मिशन यशस्वीरीत्या पूर्ण केले. या शस्त्रक्रियेमुळे एका तरुणीला नवजीवन मिळाले.