‘अल्लाउद्दीन’च्या ‘दिव्या’पायी डाॅक्टरने घालवले 2.5 कोटी रुपये; वाचा काय आहे प्रकरण

नोएडा – अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातील राक्षस मनोकामना पूर्ण करतो, ही दंतकथा आपण लहानपणी ऐकली असेल. पण असाच काल्पनिक दिवा मिळवण्याच्या नादामध्ये एका उच्चशिक्षित डॉक्टरने चक्क 2.5 कोटी रुपये गमावल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
मीरतमधील दोन भामट्यांनी एका डॉक्टरला हा दिवा विकला आणि हा दिवा 2 वर्षांपर्यंत अजिबात न वापरण्याचे बंधनही घातले. या जादूच्या दिव्यासाठी या डॉक्टरकडून तब्बल 2.5 कोटी रुपयेही उकळण्यात आले. मात्र या दिव्यातून कोणताही जीन बाहेर येत नसल्याचे आढळल्याने आपली फसवणूक झाल्याचे संबंधित डॉक्टरच्या ध्यानात आले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी इक्रमुद्दीन आणि अनीस या दोन भामट्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात डॉ. लैक खान यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवाली होती.
अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा खरोखर अस्तित्वात असून त्यातील जीन सर्व मनोकामना पूर्ण करतो, असा विश्वास या दोघांनी डॉ. खान यांना दाखवला होता. या दिव्याची मूळ किंमत 2.5 कोटी रुपये असून सवलतीच्या दरात 70 लाख रुपयांना तो विकण्यची तयारी त्यांनी दर्शवली.
दोन वर्षे या दिव्याचा वापर केल्यास काही अघटित घडण्याची भीतीही या दोघांनी दाखवली. या काळात काळ्या जादूची भीती दाखवून या दोघांनी आणखी 50 लाख रुपये उकळले. त्यानंतरही वेळोवेळी ते शाप देण्याची धमकी देऊन वेळोवेळी पैसे उकळत राहिले होते, असे डॉ. खान यांनी सांगितले.
इक्रमुद्दीन आणि अनीस यांनी अशाच प्रकारे आणखी काही जणांना हा जादुचा दिवा विकून गंडा घातला असावा आणि डॉ. खान हे त्यांचे सर्वात अलिकडील गिऱ्हाईक असावे, असा पोलिसांचा संशय आहे. त्यांनी डॉ. खान यांना दिलेला दिवा सोन्याचा नसून चक्क स्टीलचा असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
हे दोघेही अनेक वर्षांपासून जादूटोणा करण्याचे ढोंग करत आहेत. या दोघांनी चक्क व्हिजिटिंग कार्ड छापून गिऱ्हाईकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा धंदा सुरू केला होता. जादूटोण्याच्या आधारे आपल्या समस्या सोडवण्यासाठी काही जणांनी या दोघांना पूर्वी पैसेही दिले होते, असे ब्रह्मपुरीचे एसएचओ सुभाष अत्री यांनी सांगितले.





