संकेश्वर – सुट्टी असल्यामुळे डॉक्टर दाम्पत्य आपल्या 7 वर्षाच्या मुलीसह संकेश्वरहून बेळगावला जात असताना कारला भीषण अपघात झाल्यामुळे कारमधील पत्नी व मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. डॉक्टर यांची प्रकृती गंभीर आहे. हा भीषण बेनकनहोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झाला.
डॉ. श्वेता सचिन मुरगुडे (वय 38) व कु. सिया सचिन मुरगुडे (वय 7) (रा. संकेश्वर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे (वय 45) यांची प्रकृती गंभीर असून केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
डॉ. सचिन मुरगुडे हे पत्नी डॉ. श्वेता व मुलगी सिया यांच्यासोबत कारने बेळगावहून संकेश्वरच्या दिशेने भरधाव जात होते. बेनकनहोळीनजीक येताच त्यावेळी त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकला कारची मागून जोराची धडक बसली. कारमधील तिघांनाही जबर मार बसल्याने डॉ. श्वेता व मुलगी हे दोघे जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. व्ही. न्यामगौडा व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. त्यानंतर तिघांनाही बेळगाव येथील केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.