Sleep Health: रोज फक्त ६ तास झोपता? सावधान! शरीराला विळखा घालू शकतात ‘या’ गंभीर आजारांचा धोका
Sleep Health कामाचा ताण, मोबाईलचा अतिवापर आणि बिघडलेली दिनचर्या यामुळे अनेकांची झोप अपुरी राहते. मात्र, रोज सहा तासांपेक्षा कमी झोपण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम मेंदू, हृदय, वजन आणि रोगप्रतिकारशक्तीवरही होऊ शकतो.

Sleep Health: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःसाठी वेळ काढणे अनेकांना कठीण झाले आहे. कामाचा वाढता ताण, अभ्यास, मोबाईलचा अतिवापर आणि रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय यामुळे झोपेचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडत आहे. अनेकजण रोज सहा तासांपेक्षाही कमी झोप घेतात. सुरुवातीला याचा फारसा परिणाम जाणवत नसला, तरी दीर्घकाळ अपुरी झोप घेतल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. झोपेचा परिणाम केवळ शरीरावरच नाही, तर मेंदू आणि मानसिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे ही चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. (Sleep Health)
१. स्मरणशक्ती आणि एकाग्रता होते कमी (Sleep Health)
पुरेशी झोप न मिळाल्याचा सर्वाधिक परिणाम मेंदूवर होतो. दिवसभर थकवा जाणवणे, आळस येणे, चिडचिड होणे आणि कोणत्याही कामात लक्ष न लागणे अशा समस्या जाणवू शकतात. तसेच एखादा निर्णय घेताना गोंधळ होणे किंवा महत्त्वाच्या गोष्टी विसरणे असेही घडू शकते. झोपेच्या वेळी मेंदू दिवसभरातील आठवणी व्यवस्थित साठवण्याचे काम करतो. त्यामुळे सतत अपुरी झोप घेतल्यास स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.
२. वजन वाढण्याचा धोका (Sleep Health)
रोज सहा तासांपेक्षा कमी झोपल्यामुळे शरीरातील भूक आणि पोट भरल्याची जाणीव करून देणाऱ्या हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वारंवार भूक लागणे आणि गोड पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते.
अशा सवयी दीर्घकाळ कायम राहिल्यास वजन वाढण्याचा आणि लठ्ठपणाचा धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय शरीराच्या चयापचय प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे कठीण जाते. (Sleep Health)

Sleep Health: रोज फक्त ६ तास झोपता? सावधान! शरीराला विळखा घालू शकतात ‘या’ गंभीर आजारांचा धोका
३. मधुमेहाचा धोका वाढू शकतो
झोपेची कमतरता शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करते. तसेच ताण वाढल्यामुळे रक्तातील साखरेच्या नियंत्रणावरही परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ अपुरी झोप घेतल्यास टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मधुमेहापासून बचाव करण्यासाठी योग्य आहार आणि नियमित शारीरिक हालचालींसोबतच पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे आहे.
४. हृदय आणि रक्तदाबावर परिणाम
सतत कमी झोप घेतल्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. शरीराला पुरेशी विश्रांती न मिळाल्यास हृदयावरही परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झोपेकडे दुर्लक्ष करू नये.
५. रोगप्रतिकारशक्ती होते कमजोर
शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची असते. झोप पूर्ण न झाल्यास शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारांचा त्रास वारंवार होण्याची शक्यता असते. याशिवाय स्नायूंमध्ये थकवा, शरीरदुखी, सांधे आखडणे आणि थोडेसे शारीरिक काम केल्यानंतरही थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात.
डॉक्टर काय सांगतात?
डॉक्टरांच्या मते, दररोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे स्नायू दुखणे, सांधे आखडणे, ताण वाढणे आणि स्मरणशक्ती कमजोर होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकारांचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे योग्य दिनचर्या पाळणे, नियमित स्ट्रेचिंग करणे, शरीराला आराम देणे आणि श्वसनाचे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा! काम, मोबाईल आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये झोपेकडे दुर्लक्ष करू नका. प्रौढ व्यक्तींनी साधारणपणे दररोज ७ ते ९ तास झोप घेणे आवश्यक असते. चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.





