गेंड्यांची कातडी घेऊन बैठकीला बसता का?; उपमुख्यमंत्री पवारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

पुणे – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी चांगलेच संतापलेले दिसून आले. सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, वनविभाग, महावितरण आणि जिल्हा परिषद आदी विभागांना विविध विकास कामांबाबत सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
पुण्यात बदलीसाठी माझ्याकडे येता. पुण्यात पोस्टिंग दिले तर चांगले काम करायला नको? तुम्ही सगळे जबाबदार अधिकारी आहात. गोष्ट गांभीर्याने घ्यायला नको. गेंड्याची कातडी घेऊन बैठकीला बसता का, अशा थेट शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदींसह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मागील दोन महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कामे करण्यास सांगितले होते. मात्र, अधिकाऱ्यांकडून या सूचनांची कोणतीच दखल घेतली नसल्याचे दिसून आले. तसेच काय कार्यवाही केली, याची माहिती अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नव्हती. अधिकाऱ्यांच्या या बेजाबदारपणामुळे अजित पवार यांचा पारा चढला. त्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
ते म्हणाले की, पुण्यात बदली मिळावी, यासाठी माझ्याकडे, मुख्यमंत्र्याच्या मागे लागता. मग पुढे येऊन काम का करीत नाही. मला काही माहीत नाही. कितीही वर्ष पुण्यात राहा. परंतु कामात रिझल्ट द्या. अजित पवार यांच्या कडक शब्दांमुळे विधानभवनातील वातावरण अतिशय गंभीर झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांची माहिती घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, कामे दर्जेदार करा, दिलेल्या सूचनांचे पालन करा अन्यथा कोणी कितीही मोठा असू द्या, पुढच्या बैठकीत त्याला उभा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, अशा शब्दांत दम भरला.





