Rohini Khadse : पवार कुटुंबावर आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी जोरदार पलटवार केला आहे.पवार कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हते, अशी टीका खोतांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना माणसाने झेपेल तितकचं बोलायला हवे, तुमचा आणि पुरोगामी विचारांचा संबंध येता का? असा खोचक सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले होते सदाभाऊ खोत? बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. यावरून बोलताना सदाभाऊ खोत यांनी पवार कुटुंबावर टीका केली. शरद पवार यांचे कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हते. पुरोगामी पणाच्या आडोशाने सत्तागामी हाच एक कलमी कार्यक्रम पवारांनी व त्यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात राबवला आहे. राज्यात शाहू,फुले आणि आंबेडकरांचे नाव घेऊन मतांचा पुरोगामी जोगवा मागायचा. सत्तेच्या खुर्चीवर आरूढ होतात, मला पुरोगाम्यांना विचारायचं आहे ते आता आंधळे, बहिरे झाले आहेत का ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी पवारांवर शाब्दिक हल्लाबोल केला होता. Rohini Khadse रोहिणी खडसेंचा जोरदार पलटवार या टीकेनंतर रोहिणी खडसे यांनी सदाभाऊ खोत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कसंय ना, माणसाने झेपेल तितकंच बोलायला हवे! तुमचा आणि पुरोगामी विचारांचा संबंध येतो का? आदरणीय शरद पवार साहेबांच्या मातोश्री ब्रिटिश राजवटीत पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. आदरणीय शरद पवार साहेबांचे वडील हे सत्यशोधक चळवळीत काम करायचे तसेच शिक्षणाची गंगा बहुजनांच्या प्रत्येक घरात पोहोचावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यात आदरणीय शरद पवार साहेबांच्या वडिलांनी त्यांना मोलाची साथ दिली. इतकंच काय जिथं प्रतिगामी लोक वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलगा व्हावा याचा अट्टाहास करतात, तिथे पवार साहेबांनी मुलीच्या जन्माचे स्वागत केले, असे म्हणत खोतांच्या टीकेला सडेतोड शब्दांत उत्तर दिले. हेही वाचा : Maharashtra Legislative Council Election : विधानपरिषद निवडणुकीतून उद्धव ठाकरे माघार घेणार? या तीन नेत्यांना लॅाटरी लागण्याची शक्यता