Side Effects Of Eating Too Much Ghee: जास्त तूप खाता? मग ही बातमी नक्की वाचा! डॉक्टरांचा इशारा; वजन कमी करण्यापासून पचनापर्यंतचे दावे किती खरे?
Side Effects Of Eating Too Much Ghee डॉक्टरांच्या मते, एखाद्या व्यक्तीची कॅलरीची गरज, आहार आणि शारीरिक हालचाल यानुसार तुपाचे प्रमाण ठरते. साधारणपणे एक ते दोन लहान चमचे तूप आहारात समाविष्ट केले जाऊ शकते. मात्र, यापेक्षा खूप जास्त प्रमाणात तूप खाण्याची सवय लावून घेणे योग्य नाही.

Side Effects Of Eating Too Much Ghee: तूप हा भारतीय स्वयंपाकघरातील पारंपरिक पदार्थ आहे. भात, पोळी, खिचडी किंवा इतर पदार्थांमध्ये तुपाचा वापर अनेक वर्षांपासून केला जातो. योग्य प्रमाणात तूप आहाराचा भाग असू शकते. मात्र, सध्या सोशल मीडियावर तूप जास्त प्रमाणात खाण्याचे अनेक दावे व्हायरल होत आहेत. सकाळी ब्लॅक कॉफीमध्ये तूप मिसळून पिणे किंवा रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचेही सांगितले जाते.
पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, असे दावे केले जातात. मात्र, तूप जितके जास्त खाल तितके आरोग्य चांगले राहील, असे नाही. उलट तुपाचे अतिसेवन काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.
डॉक्टरांच्या मते, गरजेपेक्षा जास्त तूप खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त आरोग्यदायी फायदे मिळत नाहीत. त्यामुळे तुपावरच अधिक भर देण्यापेक्षा आहारात प्रथिने, फायबर आणि आवश्यक स्निग्ध पदार्थ योग्य प्रमाणात असणे महत्त्वाचे आहे.
दिवसाला किती तूप खावे? (Side Effects Of Eating Too Much Ghee)
डॉक्टरांच्या मते, एखाद्या व्यक्तीची कॅलरीची गरज, आहार आणि शारीरिक हालचाल यानुसार तुपाचे प्रमाण ठरते. साधारणपणे एक ते दोन लहान चमचे तूप आहारात समाविष्ट केले जाऊ शकते. मात्र, यापेक्षा खूप जास्त प्रमाणात तूप खाण्याची सवय लावून घेणे योग्य नाही.
तूपामध्ये चरबी आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुपाचे प्रमाण वाढवल्यास रोजच्या आहारातील एकूण कॅलरीही वाढू शकतात. परिणामी, वजन नियंत्रणात ठेवण्याऐवजी उलट समस्या निर्माण होऊ शकते.
Side Effects Of Eating Too Much Ghee: जास्त तूप खाता? मग ही बातमी नक्की वाचा! डॉक्टरांचा इशारा; वजन कमी करण्यापासून पचनापर्यंतचे दावे किती खरे?
वजन कमी करण्यासाठी तूप खाणे योग्य आहे का?
तूप खाल्ल्याने वजन कमी होते, असा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, वजन कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात तूप खावे, याला ठोस वैज्ञानिक आधार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तूप हा फायबरचा पर्याय ठरू शकत नाही. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी भाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्य यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे अधिक महत्त्वाचे आहे.
ब्लॅक कॉफीमध्ये तूप मिसळून प्यायल्यास?
ब्लॅक कॉफीमध्ये तूप मिसळून पिण्याचा ट्रेंडही सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. मात्र, यामुळे वजन कमी होण्यास विशेष फायदा होतो, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. उलट काही व्यक्तींना या मिश्रणामुळे पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त चरबी एकाच वेळी घेतल्यास पोट फुगणे, मळमळणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते.
पित्ताशयात खडे असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या
ज्या व्यक्तींना पित्ताशयात खडे आहेत किंवा पित्ताशयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी जास्त चरबीयुक्त पदार्थ खाताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त चरबीमुळे काही व्यक्तींमध्ये पित्ताशयातील खड्यांशी संबंधित त्रास वाढू शकतो. काही गंभीर परिस्थितींमध्ये पित्ताशयातील खड्यांमुळे सूज निर्माण होऊन स्वादुपिंडावरही परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
तूप पूर्णपणे बंद करायचे का?
तूप पूर्णपणे आहारातून काढून टाकण्याची गरज प्रत्येक व्यक्तीला नसते. मात्र, त्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे. आपल्या रोजच्या आहारातील एकूण चरबी, कॅलरी, शारीरिक हालचाल आणि आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन तूप खावे.
थोडक्यात, तूप पारंपरिक आणि आहारातील उपयोगी पदार्थ असला तरी ‘जास्त म्हणजे जास्त फायदा’ हा समज चुकीचा आहे. संतुलित आहार, योग्य प्रमाण आणि नियमित शारीरिक हालचाल हेच चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. सोशल मीडियावरील कोणताही आरोग्यविषयक ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी त्यामागे वैज्ञानिक आधार आहे का, हे तपासणे गरजेचे आहे.





