Sandeep Deshpande : आम्हाला गणेशोत्सवात फक्त गरबा बघायचा आहे का? संदीप देशपांडे संतापले; ‘लालबागचा राजा’ मंडळावर हल्लाबोल
Sandeep Deshpande : मुंबईतील गणेशोत्सवाला कॉर्पोरेट स्वरुप आल्याचा दावा त्यांनी केला आहे. संदीप देशपांडे यांनी लालबागच्या राजा मंडळावर थेट आरोप केला आहे.

Sandeep Deshpande : “गणेशोत्सव हा मराठी मातीतील सण होता. मात्र, आता मुंबईतील गणेश मंडळं कॉर्पोरेट वॉरचा भाग होणार असतील, याच्यापेक्षा दुर्दैव नाही. आम्हाला उद्या गणेशोत्सवात फक्त गरबा बघायचा आहे का, गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात देऊन. याची सुरुवात गेल्यावर्षी लालबागच्या राजाने केली.” असा शब्दांत थेट हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईतील गणेशोत्सवाला कॉर्पोरेट स्वरुप आल्याचा दावा त्यांनी केला आहे. संदीप देशपांडे यांनी लालबागच्या राजा मंडळावर थेट आरोप केला आहे. ते म्हणाले ‘लालबागचा राजा’ मंडळाने गेल्यावर्षी गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात दिला. ही अत्यंत दुर्दैवीच गोष्ट आहे. गणेशोत्सव थाटामाटात साजरा करायला पैसे लागतात, पण किती पैसे लागतात तुम्हाला? आज लालबागचा राजा मंडळाकडे कोट्यवधी रुपये जमा होतात ना, लोकं स्वत: तुम्हाला देणग्या देतात, मग किती पैसे लागतात तुम्हाला, कशाला अंबानी पाहिजे तुम्हाला तिकडे. अशा शब्दांत सुनावलं आहे.
…तर इतिहास त्यांना माफ करणार नाही.
पुढे ते म्हणाले, अनंत अंबानी असा काय मोठा सल्ला देतात, जो इतकी वर्षे तुम्हाला मिळाला नाही. गणेशोत्सव मंडळाची कंपनी करायची आहे का, असा संतप्त सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मराठी मातीतील आणि मराठी माणसाचा सण आहे. तो या उद्योगपतींच्या हातात तुम्हाला द्यायचा आहे का? आता गणपतीत आम्ही गरबा चालू करायचा का आम्ही, आमचे मराठी सण तुम्ही गुजराती कंपन्यांच्या हाती देणार आहात का? याचा सगळ्यात मोठा दोषी कोण असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी टीकास्त्र डागले. संदीप देशपांडे यांनी केलेल्या आरोपांवर लालबागच्या राजा मंडळाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.






