पिंपरी चिंचवडकरांना अभिमान वाटेल असे काम करा

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवा, पिंपरी चिंचवडकरांना अभिमान वाटेल, असे काम करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना दिला.
पोलीस आयुक्तालयामध्ये कोणकोणती कामे झाली आहेत, पोलीस ठाण्यांच्या इमारती, पोलीस भरती, वाहनांची संख्या, गुन्ह्यांचा आढावा उपमुख्यमंत्री यांनी बुधवारी (दि. ९) घेतला.
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला ५७ चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या वाहनांचे लोकार्पण उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या ‘स्थायी आदेश’ या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार अण्णा बनसोडे, आश्विनी जगताप, उमा खापरे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, शिवाजी पवार, स्वप्ना गोरे, माधूरी कांगणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलीस आयु्क्त चौबे यांनी पीपीटीच्या माध्यमातून कामाचे सादरीकरण केले. पवार यांनी पोलिसांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पोलीस आयुक्त चौबे यांच्या कामाचे कौतुक केले.
महिला सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्या
पिंपरी-चिंचवड शहरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती अजित पवार यांना देण्यात आली. त्यावर महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्या, अशी सूचना त्यांनी पोलिसांनी केली.
पोलीस आयुक्तालयाला मिळालेल्या ५७ वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यत्र्यांनी पोलीस आयुक्तालायाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
त्यानंतर पोलिसांच्या कामाचे त्यांनी कौतूक केले. तसेच, काही गोष्टींमध्ये विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. – विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड
पिंपरी- चिंचवड पोलिसांना काय मिळाले
– पोलिस आयुक्तालय कार्यालयासाठी चिखली येथे १५ एकर जागा हस्तांतरीत
– पोलिसांच्या निवासस्थानासाठी वाकड येथे नऊ एकर जागा मंजूर
– बावधन, संत तुकारामनगर, काळेवाडी, दापोडी अशा चार नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी
– पोलीस आयुक्तालय नविन इमारतीच्या आरखड्यास मंजूरी
– पिंपरी पोलीस ठाणे आणि २०० निवासस्थानांसाठी निधी मंजूर
– आळंदी पोलीस ठाण्याच्या नविन इमारतीचा आरखडा मंजूर
– महाळूंगे पोलिस ठाण्यासाठी सीएसआर फंडातून १६ कोटींचा निधी





