कोयना धरणग्रस्तांचा “करो या मरो’चा इशारा

कोयनानगर कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर गेल्या पाच वर्षांत अनेक आंदोलने झाली. मात्र, त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. आपल्या मागण्यांसाठी धरणग्रस्त सोमवारी कोयना नदीच्या पात्रात उतरले.
“आमच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडवायची सुबुद्धी शासनाला दे, असे साकडे त्यांनी घातले. कोयनामाईची शपथ घेत, आपल्या समस्या सुटेपर्यंत “करो या मरो’चा निर्धार त्यांनी केला. येत्या दहा दिवसात धरणग्रस्तांना जमिनीचे वाटप झाले नाही, तर कोयना काठावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. सरकारने निर्णय घेतला नाही, तर कोयनापुत्रच सरकारबाबत निर्णय घेतील, असा इशाराही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
डॉ. पाटणकर म्हणाले, कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनाच्या मागणीसाठी गेल्या पाच वर्षांत कोयनाकाठावर अनेक आंदोलने करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः प्रकल्पग्रस्त असतानाही, निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात ते एक बैठकही घेऊ शकले नाहीत. ही शोकांतिका आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे महेश शेलार, चैतन्य दळवी, सचिन कदम, बळीराम कदम, श्रीपती माने, राम कदम, तानाजी बेबले, विनायक शेलार उपस्थित होते. तहसीलदार रमेश पाटील, मंडलधिकारी संजय जंगम, तलाठी देवकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सपोनि नवनाथ गायकवाड, उत्तम भापकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.





