SEBI appeal : अनधिकृत प्लॅटफॉर्मवर शेअर्सचा व्यवहार करु नका; सेबीचे गुंतवणूकदारांना पुन्हा आवाहन
SEBI appeal : बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांना अनधिकृत इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सद्वारे सूचीबद्ध नसलेल्या सार्वजनिक मर्यादित कंपन्यांच्या सिक्युरिटीजची खरेदी-विक्री करण्याविरोधात सावध केले आहे.

SEBI appeal : बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांना अनधिकृत इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सद्वारे सूचीबद्ध नसलेल्या सार्वजनिक मर्यादित कंपन्यांच्या सिक्युरिटीजची खरेदी-विक्री करण्याविरोधात सावध केले आहे. अशा संस्थांना नियामकाकडून मान्यता नाही आणि त्यांचे नियमनही केले जात नाही, असा इशारा सेबीने दिला आहे.
नियामकाने म्हटले आहे की, त्यांच्या निदर्शनास आले आहे की काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म सार्वजनिक मर्यादित कंपन्यांच्या सूचीबद्ध नसलेल्या सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करत आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे.
सेबीने डिसेंबर 2024 आणि ऑगस्ट 2016 मध्ये जारी केलेल्या आपल्या पूर्वीच्या सूचनांचा पुनरुच्चार केला आहे, ज्यात गुंतवणूकदारांना अशा प्लॅटफॉर्मवर व्यवहार करण्यापासून किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती शेअर करण्यापासून सावध केले आहे. नियामकाने पेपर ट्रेडिंग, फँटसी गेम्स आणि सूचीबद्ध नसलेल्या कर्ज सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करणार्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील आपल्या पूर्वीच्या इशार्यांचाही संदर्भ दिला आहे.
केवळ मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजनाच निधी उभारणी आणि सिक्युरिटीजच्या व्यापारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा अधिकार आहे. मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजची यादी नियामकाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.अशा अनधिकृत व्यासपीठांवर सहभागी होणार्या गुंतवणूकदारांना औपचारिक सिक्युरिटीज बाजारात उपलब्ध असलेल्या नियामक सुरक्षा उपायांचा लाभ मिळणार नाही.
यामध्ये सेबी आणि स्टॉक एक्सचेंजच्या अधिकारक्षेत्रातील गुंतवणूकदार संरक्षण लाभांचा, तसेच एक्सचेंजद्वारे प्रशासित गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा आणि एक्सचेंज व डिपॉझिटरीजद्वारे चालवल्या जाणार्या ऑनलाइन विवाद निराकरण व्यासपीठाच्या उपलब्धतेचा समावेश आहे.




