मंचर : बाजार तळालगत 11 नंबरच्या गाळाधारकांना गाळे खाली करण्याबाबतच्या नोटीसा देऊन गुरुवार (दि. 12) कारवाई करण्याचे नियोजन नगरपंचायतने केले होते. त्यामुळे भयभीत झालेल्या गाळेधारक आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांची मंचर येथील संपर्क कार्यालयात भेट घेत त्यांना समस्या सांगितली. वळसे पाटील यांनी ही कारवाई स्थगित करण्याच्या सूचना मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना समक्ष दिल्याने गाळाधारकांना सद्यस्थितीत कारवाई पासून दिलासा मिळाला आहे. नगरपंचायतीच्या वतीने 11 नंबरच्या गाळाधारकांना दिनांक 12 डिसेंबर 2024 पर्यंत गाळे खाली करा, अन्यथा पोलीस बंदोबस्तात कारवाई करू, अशा प्रकारच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. ही कारवाई चुकीची असून नगरपंचायतीने गाळाधारकांवर अन्याय करू नये, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा मंचर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी दिला होता. त्यानंतर गाळा धारकांच्या शिष्टमंडळाने माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर गाळाधारकांबाबत योग्य तो मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. सर्वपक्षीय शिष्ट मंडळात सुनील बाणखेले, दत्ता गांजाळे, सुहास बाणखेले, लक्ष्मणराव थोरात, सागर काजळे, राजू इनामदार, गणपतराव क्षीरसागर धनेश मोरडे, प्रवीण मोरडे, जे. के. थोरात, संजय बाणखेले, जगदीश घिसे, सचिन महाराज बेंडे, गाळेधारक अशोक गांजाळे, सुरेंद्र वर्हाडी, सुरेश राशिनकर, नवनाथ क्षीरसागर, खंडू निघोट, सागर निघोट इत्यादी उपस्थित होते.