पुणे जिल्हा | अतिक्रमणधारकांना पाठिशी घालू नका

पारगाव, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील पारगाव येथील ग्रामसभेत ४३ अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी व कोणत्याही अतिक्रमणधारकास पाठीशी घालण्यात येऊ नये, असा इशारा देत संभाजी ताकवणे यांनी सत्ताधार्यांना धारेवर धरले.
विठ्ठल मंदिर या ठिकाणी ग्रामसभा पार पडली. यावेळी कोरमअभावी सभा सुरू होण्यास उशीर झाला असताना सुद्धा ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. गायरान अतिक्रमणचा विषय तापला होता. यावेळी विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा पार पडली.
यावेळी मुलांना खेळण्यासाठी तातडीने ग्राउंडला जागा आरक्षित करावी. नाहीतर ५२ हेक्टर गायरानमधील काहीच जागा शिल्लक राहणार नाही, असे मत समीर बोत्रे यांनी मांडले.
प्रथम वन विभाग व गायरान यांची हद्द कायम करून घ्यावी व कोणतीही कारवाई कायद्याच्या चौकटीत व्हावी, असे विजय वनशिव यांनी स्पष्टपणे सांगलते. नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सरपंच सुभाष बोत्रे व उपसरपंच संभाजी ताकवणे यांनी उत्तरे दिली.
यावेळी भास्कर ताकवणे, संभाजी ताकवणे, सोमनाथ ताकवणे, संजय ताकवणे, शामराव ताकवणे, महेंद्र ताकवणे, समीर बोत्रे, तुकाराम ताकवणे, विजय वनशिव, वैभव बोत्रे, विजय चव्हाण, दधरथ बोत्रे यांनी सहभाग घेतला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
मतदान करेल, त्याला लाभ द्या
लोकशाहीच्या देशात मतदानाबाबत अजून ही जागृती झाली नसल्याने अजून लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीत. त्यासाठी जो मतदान केंद्रावर येऊन मतदान करेल, त्यालाच शासकीय योजनांचा लाभ मिळावा, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात यावे, असे मत संजीव ताकवणे व संभाजी ताकवणे यांनी व्यक्त केले. ज्या कोणास कोणताच उमेदवार पसंद नाही, त्याने आपले मत नोटाला द्यावे. परंतु मतदान देण्यासाठी यावे या निर्णयाचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.





