‘इतर’ देशातील वस्तू अमेरिकेला निर्यात करू नका; वाणिज्य मंत्रालयाच्या देशातील निर्यातदारांना सूचना

नवी दिल्ली – अमेरिकेने इतर देशाविरोधात भारतापेक्षा जास्त आयात शुल्क लावले आहे. अशा परिस्थितीत जास्त आयात शुल्क असलेल्या देशातून आलेल्या वस्तू भारतातील म्हणून अमेरिकेला निर्यात करू नका, अशी स्पष्ट सूचना वाणिज्य मंत्रालयाने भारतातील निर्यातदारांना केली आहे.
अमेरिकेने वस्तू ‘मुळात नेमक्या कोणत्या देशातून’ आली आहे हे शोधण्यासाठी रूल्स ऑफ ओरिजिन ही संकल्पना लागू केलेली आहे. त्यामुळे निर्यातदारांनी इतर देशातून आलेली वस्तू जशीच्या तशी अमेरिकेला निर्यात करू नये. जर इतर देशातून आलेल्या वस्तूचे योग्य पातळीवर मूल्यवर्धन केले असेल तरच ती वस्तू अमेरिकेला निर्यात करावी. यासाठीची मार्गदर्शक नियमावली वाणिज्य मंत्रालय लवकरच जाहीर करणार आहे.
भारत – अमेरिका व्यापार कराराच्या चर्चेचे नेतृत्व वाणिज्य मंत्रालयातील विशेष सचिव राजेश अग्रवाल हे करीत आहेत. राजेश अग्रवाल यांनी भारतातील निर्यातदारांची बैठक घेऊन या संदर्भात तपशीला चर्चा केली.
भारतातून अमेरिकेला कृषी उत्पादने, तयार कपडे, कापड, वाहनांचे सुटे भाग इत्यादींची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. मात्र वस्तू भारतातच तयार झाल्या पाहिजेत अशी अमेरिकेची सूचना आहे. त्या अनुषंगाने योग्य निर्यातदारांना मदत करण्यासाठी वाणिज्य मंत्रालय आवश्यक उपाययोजना करणार आहे.
ब्लॅकलिस्ट होण्याचा धोका
अमेरिकेने चीन विरोधात 145 टक्के आयात शुल्क लावले आहे. चीन हा अमेरिकेचा मोठा निर्यातदार देश होता. अशा परिस्थितीत चीनसारख्या देशातून वस्तू आयात करून त्या भारतामार्गे अमेरिकेला पाठविण्याची शक्यता ध्यानात घेऊन वाणिज्य मंत्रालय निर्यातदारांना या संदर्भात सावध करीत आहे. जर निर्यातदारांनी चीन किंवा इतर देशातून आलेल्या वस्तू अमेरिकेला निर्यात केल्या तर अमेरिका अशा कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करू शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.





