माझ्या कामाचे श्रेय इतरांना देऊ नका: आ. नीलेश लंके

नारायणडोह – अकोळनेर गाव विकासकामांसाठी दत्तक घेतले असून, या गावच्या विकासाची जबाबदारी माझी आहे. पण मी पाठपुरावा केलेल्या कामाचे श्रेय इतरांना देऊ नका. मी कधीच इतरांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेत नाही, असे प्रतिपादन आ. नीलेश लंके यांनी केले.
नगर तालुक्यातील अकोळनेर येथे संत शिरोमणी सावता महाराज जयंती कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या मंदिरासाठी पंधरा लाख रुपयांची संरक्षक भिंत पुढील सावता महाराज पुण्यतिथीपर्यंत बांधून देणार असल्याचे आ. लंके यांनी या वेळी सांगितले. पारंपरिक वाद्य वाजवत सावता महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमधील पालखीची पूजा माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते करण्यात आली. गावात विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या नागरिकांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.
सावता महाराज मंदिरासाठी आ. लंके यांनी दहा लाख रुपायाचे सभामंडप बांधून दिले, तसेच गावासाठी दोन कोटी 60 लाख रुपयांची कामे मंजूर केली, तसेच लामखडे यांनी सभामंडपासाठी सहा लाख रुपये दिल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे सन्मान करण्यात आला.
उत्सव समितीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अमृता दीदी व पोपट महाराज गारुडकर यांचे हरिकीर्तन व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
