Family Relationships: घरात रोज छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात? तुमच्याही ‘या’ ६ चुका नात्यांमध्ये वाढवत असतील कटुता!
Family Relationships अनेकदा वादाचे कारण केवळ एखादी घटना नसते, तर त्या घटनेबद्दल आपण कशा पद्धतीने बोलतो, हेही महत्त्वाचे असते. टोमणे मारणे, समोरच्याचे बोलणे मध्येच थांबवणे किंवा प्रत्येक वेळी स्वतःलाच योग्य ठरवण्याचा प्रयत्न करणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. त्यामुळे संवादाच्या काही सवयी बदलल्यास नात्यांमधील तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया अशा सहा चुका, ज्या टाळणे महत्त्वाचे आहे.

Family Relationships: घर म्हटलं की प्रेम, आपुलकी आणि आनंदासोबतच मतभेदही आलेच. कधी एखादी वस्तू जागेवर न ठेवल्यामुळे, तर कधी फोन न उचलल्यामुळे किंवा उशिरा घरी आल्यामुळे घरात वाद होऊ शकतात. सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या या गोष्टींचे रूपांतर कधी मोठ्या भांडणात होते, हे अनेकदा लक्षातही येत नाही. अशा सततच्या वादांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढू शकतो आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.
अनेकदा वादाचे कारण केवळ एखादी घटना नसते, तर त्या घटनेबद्दल आपण कशा पद्धतीने बोलतो, हेही महत्त्वाचे असते. टोमणे मारणे, समोरच्याचे बोलणे मध्येच थांबवणे किंवा प्रत्येक वेळी स्वतःलाच योग्य ठरवण्याचा प्रयत्न करणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. त्यामुळे संवादाच्या काही सवयी बदलल्यास नात्यांमधील तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया अशा सहा चुका, ज्या टाळणे महत्त्वाचे आहे.
१. प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारणे
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून छोटी चूक झाली, तरी तिला टोमणे मारण्याची सवय काही जणांना असते. ‘तुला कोणतंच काम नीट करता येत नाही’, ‘तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती’, अशी वाक्ये समोरच्या व्यक्तीला दुखावू शकतात.
काय करावे? व्यक्तीच्या स्वभावावर टीका करण्याऐवजी नेमक्या समस्येबद्दल बोला. उदाहरणार्थ, ‘हे काम उशिरा झालं, पुढच्या वेळी आपण ते लवकर पूर्ण करूया’, असे शांतपणे सांगता येईल.
२. समोरच्याचे बोलणे मध्येच थांबवणे
आपली बाजू मांडण्याच्या घाईत अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण होण्याआधीच उत्तर देऊ लागतो. त्यामुळे आपले म्हणणे ऐकून घेतले जात नाही, असे तिला वाटू शकते. परिणामी, दोन्ही बाजूंनी एकच मुद्दा पुन्हा पुन्हा मांडला जातो आणि वाद वाढतो.
काय करावे? समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे पूर्ण करू द्या. तिचे बोलणे शांतपणे ऐकल्यानंतर आपली बाजू मांडा. संवादात ऐकणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आपले मत मांडणेही महत्त्वाचे आहे.
३. प्रत्येक वादात जुन्या चुका उकरून काढणे
आजच्या एखाद्या छोट्या विषयावर चर्चा सुरू असताना जुन्या चुका किंवा पूर्वीचे वाद पुन्हा समोर आणले जातात. यामुळे सध्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. जुन्या घटनांमुळे मनातील नाराजी वाढू शकते.
काय करावे? एका वेळी एका समस्येवर चर्चा करा. जुन्या गोष्टींचा उल्लेख केवळ सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी आवश्यक असेल, तेव्हाच करा.

Family Relationships
४. प्रत्येक वेळी स्वतःचीच बाजू योग्य ठरवणे
समोरची व्यक्ती आपल्यामुळे दुखावली गेल्याचे सांगत असताना लगेच स्वतःची बाजू स्पष्ट करणे किंवा प्रत्येक गोष्टीसाठी कारणे देणे यामुळे तिच्या भावनांकडे दुर्लक्ष होऊ शकते. प्रत्येक वेळी आपणच बरोबर आहोत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास संवादाचे रूपांतर वादात होऊ शकते.
काय करावे? समोरच्या व्यक्तीच्या भावनाही समजून घ्या. आपली चूक लक्षात आल्यास ती मान्य करा. ‘माझ्या बोलण्यामुळे तुला वाईट वाटलं, याची मला जाणीव आहे. पुढच्या वेळी मी काळजी घेईन’, असे सांगणे नात्यातील तणाव कमी करू शकते.
५. रागाच्या भरात मोठ्या आवाजात बोलणे
राग आल्यावर आवाज चढवणे, अपमानास्पद शब्द वापरणे किंवा उपरोधिक बोलणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. अशा वेळी समोरची व्यक्ती समस्या समजून घेण्याऐवजी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करू लागते.
काय करावे? राग वाढत असल्याचे जाणवल्यास काही वेळ थांबा. स्वतःला शांत होण्यासाठी वेळ द्या आणि त्यानंतर चर्चा करा. मतभेद असले तरी एकमेकांचा आदर राखणे महत्त्वाचे आहे.
६. नाराज होऊन संवाद पूर्णपणे बंद करणे
वाद झाल्यानंतर काही काळ शांत राहणे किंवा एकटे बसणे चुकीचे नाही. मात्र, समोरच्या व्यक्तीला काहीही न सांगता दीर्घकाळ बोलणे बंद केल्यास गैरसमज वाढू शकतात. यामुळे समस्या सुटण्याऐवजी नात्यातील अंतर वाढू शकते.
काय करावे? आपल्याला शांत होण्यासाठी वेळ हवा असल्यास ते स्पष्टपणे सांगा. ‘आत्ता मला थोडं अस्वस्थ वाटत आहे. आपण काही वेळाने शांतपणे बोलूया’, असे सांगितल्याने समोरच्या व्यक्तीलाही परिस्थिती समजण्यास मदत होते.
नात्यांमध्ये संवाद महत्त्वाचा!
कुटुंबात चांगला संवाद असणे म्हणजे कधीच मतभेद होऊ नयेत, असे नाही. प्रत्येक व्यक्तीचे विचार, स्वभाव आणि अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात. मात्र, मतभेद असतानाही एकमेकांशी आदराने बोलणे, समोरच्याचे म्हणणे ऐकणे आणि समस्येवर एकत्रित उपाय शोधणे महत्त्वाचे आहे.
वाद वारंवार होत असतील आणि त्याचा नात्यांवर गंभीर परिणाम होत असेल, तर कुटुंब समुपदेशकाची मदत घेणेही उपयुक्त ठरू शकते. कारण नात्यांमध्ये प्रत्येक वेळी कोण जिंकले, यापेक्षा एकमेकांना समजून घेऊन समस्या कशी सोडवली, हे अधिक महत्त्वाचे असते.




