Pune : काहीही करा… पण धूळ रोखा!

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांत धोकादायक पीएम.२.५ धुळीकणांचे प्रमाण लक्षणीय स्वरूपात वाढले असल्याने शहराची प्रदूषण पातळी वाढली आहे. याची गंभीर दखल हे वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने यासाठी केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास दिल्या आहेत. त्याची दखल घेत महापालिकेने शहरातील बांधकाम व्यावसायिक, तसेच रेडी मिक्स सिमेंट प्लांट (आरएमसी) चालकांना आठ दिवसांत धूळ रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबतच्या सूचना महापालिकेकडून सर्व बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, बांधकाम राडाराेडा वाहतूक करणारे, तसेच आरएमसी प्लांटचालकांना ईमेलद्वारे दिल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, तर कोथरूड, बाणेर, बालेवाडी, वारजे माळवाडी, कर्वेनगर, धायरी, नर्हे, कात्रज, आंबेगाव, हडपसर, कोंढवा, मुंढवा, खराडी, धानोरी, येरवडा, विश्रांतवाडी, बोपोडी येथेही नवीन बांधकामे सुरू आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, ती रस्त्यावर, तसेच हवेत मिसळत आहे. त्यामुळे आसपासचे नागरिक, तसेच प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मागील वर्षीही अशाच प्रकारे धुळीचा त्रास वाढल्याने महापालिकेने नियमावली जाहीर केली होती. त्यात बांधकामाच्या सीमाभिंतीला 25 फूट उंचीचे पत्रे लावणे, बांधकाम सुरू असलेले ठिकाण हिरव्या कापडाने झाकणे, या कापडावर पाणी मारणे, यातून धूळ उडण्यावर नियंत्रण आणणे, तसेच रस्त्याच्या कडेला काम सुरू असल्यास त्यावर वर्दळीच्या वेळी पाणी मारणे, राडाराेडा वाहतूक करताना ताे झाकून न्यावा, अशा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर महापालिकेची तपासणी होईपर्यंतच या नियमांचे पालन झाले. मात्र, त्यानंतर ये रे माझ्या मागल्या, अशीच स्थिती झाली आहे.
आरएमसी प्रकल्पांनाही इशारा
शहराच्या विविध भागांत रेडी मिक्स सिमेंट प्लांट (आरएमसी) मधून सिमेंटची वाहतूक करणारे मिक्सर, डंपर यांच्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. शहरात अनेक भागांत नदीच्या लगतच, तसेच वर्दळीच्या रस्त्यांच्या शेजारी हे प्रकल्प असून, धुळीची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे सिमेंटची वाहतूक करताना प्रदूषण महामंडळाच्या नियमांचे पालन होत नसल्याबद्दल नोटीस बजावण्याचे आदेश शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी बांधकाम विभागास दिले आहेत. रस्ते खडी व सिमेंटमुक्त असले पाहिजेत, वेळीच रस्त्याची स्वच्छताही झाली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत.





