Dmk mp s jagathrakshakan news – अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने बुधवारी एका मोठ्या कारवाईची माहिती दिली आहे. ईडीने म्हटले आहे की, द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) लोकसभा खासदार एस जगतरक्षकन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 908 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच 89.19 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. 908 कोटींचा दंड का ठोठावला? ईडीने परकीय चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीएमकेचे खासदार जगतरक्षकन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 908 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबर 2020 मध्ये फेमा कायद्यांतर्गत जप्त केलेली 89.19 कोटी रुपयांची मालमत्ता 26 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानंतर जप्त करण्यात आली आहे. एस. जगतरक्षकन कोण आहेत? 76 वर्षीय डीएमके नेते एस जगतरक्षकन तामिळनाडूमधील अरकोनम लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. ते तमिळनाडूतील एक प्रसिद्ध उद्योगपतीही आहेत. ईडीने अशी माहिती दिली आहे की खासदार एस जगतरक्षकन, त्यांचे कुटुंब आणि संबंधित भारतीय संस्थांविरुद्ध परकीय चलन व्यवस्थापन कायदा आणि फेमा अंतर्गत तपास सुरू करण्यात आला होता. तपासाअंती, 11 सप्टेंबर 2020 रोजी FEMA च्या कलम 37A अन्वये खासदार जगतरक्षकन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या अनेक स्थावर आणि जंगम मालमत्तेसाठी जप्तीचा आदेश पारित करण्यात आला. त्यांची किंमत 89.19 कोटी रुपये आहे. ही मालमत्ता जप्त करण्यात आली असून आता खासदाराला 908 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.