दीपावलीच्या विक्रमी विक्रीतून अर्थव्यवस्थेला बळ! 6 लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल; केवळ सोने-चांदीवर 60500 कोटींचा खर्च

नवी दिल्ली: यंदाच्या दीपावली सणासुदीच्या काळात भारतात विक्रमी ६.०५ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. व्यापारी संघटना ‘कॅट’ने (कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) मंगळवारी ही माहिती दिली. या एकूण विक्रीपैकी ५.४० लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री झाली असून, ६५,००० कोटी रुपये सेवा क्षेत्रातून आले आहेत.
विक्रीत मोठी वाढ:
गेल्या वर्षी दीपावलीच्या काळात ४.२५ लाख कोटी रुपयांची विक्री झाली होती. या तुलनेत यंदाच्या विक्रीने मोठी झेप घेतली आहे. कॅटच्या मते, जीएसटी दरांतील अलीकडच्या कपातीमुळे आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे यंदा विक्रमी विक्रीची नोंद झाली आहे. देशभरातील ६० प्रमुख वितरण केंद्रांच्या सर्वेक्षणातून ‘कॅट’ने हे आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यांच्या राजधानीची शहरे तसेच द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांचा समावेश आहे.
लहान व्यापाऱ्यांचे मोठे योगदान:
एकूण व्यापारात ८५ टक्के योगदान हे मुख्य प्रवाहातील किरकोळ विक्रीचे राहिले आहे, यात विशेषतः गैर-कॉर्पोरेट आणि पारंपरिक बाजारांचा समावेश आहे. ऑनलाइन खरेदीच्या जमान्यात लहान व्यापारी आणि प्रत्यक्ष बाजारपेठेने जोरदार पुनरागमन केल्याचे हे आकडे दर्शवतात.
क्षेत्रनिहाय विक्रीची आकडेवारी:
विक्रीच्या आकडेवारीत विविध क्षेत्रांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
-राशन आणि दैनंदिन वस्तू: १२%
-सोने आणि दागिने: १०% (सुमारे ६०,५०० कोटी रुपये)
-इलेक्ट्रॉनिक्स आणि वीज उपकरणे: ८%
-टिकाऊ ग्राहक उत्पादने: ७%
-रेडीमेड कपडे: ७%
-भेटवस्तू: ७%
-घरगुती सजावट: ५%
फर्निचर: ५%
-मिठाई आणि नमकीन: ५%
-वस्त्रोद्योग: ४%
-पूजा साहित्य आणि फळे-सुकामेवा: प्रत्येकी ३%
जीएसटी कपात ठरली निर्णायक:
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी सांगितले की, सेवा क्षेत्राने पॅकेजिंग, हॉस्पिटॅलिटी, कॅब सेवा, प्रवास, कार्यक्रम आयोजन, तंबू (टेंट) आणि सजावट, मनुष्यबळ आणि पुरवठा यातून ६५,००० कोटी रुपयांचे योगदान दिले. सर्वेक्षणात सहभागी ७२ टक्के व्यापाऱ्यांनी दैनंदिन वापराच्या वस्तू, पादत्राणे, वस्त्रे, मिठाई, घरगुती सजावट आणि टिकाऊ ग्राहक उत्पादनांवरील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरातील कपात हे उच्च विक्रीचे मुख्य कारण असल्याचे सांगितले. स्थिर किमतींमुळे ग्राहकांचे समाधान वाढले आणि सणासुदीच्या काळात खर्चाला प्रोत्साहन मिळाले.
रोजगार निर्मितीला चालना: दीपावलीदरम्यान वाढलेल्या व्यावसायिक हालचालींमुळे ५० लाख तात्पुरत्या रोजगारांची निर्मिती झाली. एकूण व्यापारात ग्रामीण आणि निमशहरी भागाचा वाटा २८ टक्के राहिला.





