दिवाळी पदार्थांची अनेकांनी केली खरेदी

सातारा – जिल्हा परिषदेच्या उमेद अभियानांतर्गत स्वयम सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या दिवाळी महोत्सवातून सुमारे दोन लाख रूपयांची उलाढाल झाली. ऐन दिवाळीत महिलांना फराळ विक्रीतून आर्थिक आधार मिळाला. फराळाच्या विविध पदार्थांची महिला व नागरिकांनी खरेदी केली.
जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अस्सल गावरान चवीचे, शुध्द व सात्विक पदार्थ तयार केले. त्याचे प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या मैदानावर झाले. प्रशासनामार्फत जिल्ह्याच्या विविध भागांतील सुमारे ३० निवडक बचत गटांची या प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली होती. ग्रामीण भागातील महिलांनी बनविलेल्या गावरान दिवाळी पदार्थांंमुळे शहरातील खव्वैय्यांची पावले जिल्हा परिषद मैदानावर पडू लागली. गेल्या २ ते ३ दिवसांच्या कालावधीत सुमारे २ लाखाहून अधिक रूपयांची उलाढाल झाली. प्रदर्शनाला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी भेटी देऊन बचत गटातील महिलांशी केलेल्या उत्पादित मालाबाबत चर्चा केली. अनेक महिला व नागरिकांनी दिवाळी पदार्थांची बचत गटांना ऑर्डरही दिली. त्यामुळे उमेदच्या महिलांना आर्थिक आधार मिळाला.





