पिंपरी | वृत्तपत्र विक्रेत्यांचा दिवाळी कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ (पुणे – पिंपरी, चिंचवड) यांच्या चिंचवड विभागाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विक्रेत्यांना दिवाळी भेट वस्तू आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण चिंचवड विभाग कुटुंबासह उपस्थित होता. दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा स्नेह मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
चिंचवडमधील काशिधाम मंगल कार्यालयात हा स्नेह मेळावा पार पडला. याप्रसंगी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष सचिव खजिनदार तसेच पदाधिकारी विभाग प्रमुख संघटक प्रेस माध्यम समूहाचे सर्व प्रतिनिधी, अधिकारी तसेच विक्रेते बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे यांनी मार्गदर्शन करत विक्रेत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पथारी संघटनेचे नवनिर्वाचित पॅनल प्रमुख काशिनाथ नखाते उपस्थित होते. त्यांनीही विक्रेत्यांच्या कष्टाचे व कामाचे कौतुक केले. स्टॉल धारकांसाठी विशेष लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना दिले. चिंचवड विभागातर्फे हर्षद राव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दळवी यांनी केले. चिंचवड विभागाचे विभाग प्रमुख मनोज काकडे यांनी स्वागत केले. विश्वस्त राजकुमार ढमाले यांनी आभार मानले.

