Baramati News : परस्पर संमतीने १८ दिवसांत घटस्फोटाचा दावा मंजूर
Baramati News : या निर्णयातील गुणोत्तराचा आधार घेऊन तसेच स्नेहा हिस तातडीने शिक्षणा करीता परगावी जाणेबाबतचा केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे कोर्टाने सहा महिन्यांचा कुलिंग पिरियड माफ केला व सदर अर्जामध्ये दोघांचेही वडिलांचे प्रतिज्ञापत्र घेऊन सदर अंतिम अर्जाचा १८ दिवसांमध्ये न्याय निर्णय दिला.

बारामती : प्रथमेश आणि स्नेहा (दोघांचीही नावे बदललेली) यांचा दि. १९ में २०२० रोजी विवाह झाला होता. काही काळ एकत्र नांदल्यानंतर दोघांचेही विचार एकदम भिन्न असल्याचे एकमेकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण विचारांती एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता दोघेही दि.१३ जून २०२२ पासून विभक्त राहत होते.
दोघांचेही कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी त्यांचे दोघांनमध्ये समेट घडवून आणण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु ते दोघेही संमतीने घटस्फोट घेण्यावर ठाम राहिले. त्यामुळे त्यांनी अॅड. जब्बार सय्यद बारामती यांच्यामार्फत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बारामती जि.पुणे यांचे न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्याकरिता हिंदू विवाह कायदा १९५५ चे कलम १३ प्रमाणे अर्ज दाखल केला. त्यामध्ये मे कोर्टाने सदरचा अर्ज मध्यस्थी केंद्राकडे पाठवला परंतु दोघांनीही संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय निश्चित केल्याचे सांगितले.
त्यामुळे सहा महिन्यांचा कुलिंग पिरियड माफ करून मिळणेकरीता अॅड. जब्बार सय्यद यांनी सादर केलेल्या मा सर्वोच्च न्यायालयाच्या अमरदीप सिंग विरुद्ध हरविण कौर (ए आय आर २०१७ सुप्रिम कोर्ट) या निर्णयातील गुणोत्तराचा आधार घेऊन तसेच स्नेहा हिस तातडीने शिक्षणा करीता परगावी जाणेबाबतचा केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे कोर्टाने सहा महिन्यांचा कुलिंग पिरियड माफ केला व सदर अर्जामध्ये दोघांचेही वडिलांचे प्रतिज्ञापत्र घेऊन सदर अंतिम अर्जाचा १८ दिवसांमध्ये न्याय निर्णय दिला. म्हणजेच १८ दिवसांमध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बारामती यांनी हिंदू विवाह कायदा 1955 चे कलम 13 ब अन्वये घटस्फोट मंजूर केला.




