पुणे – पती आणि पत्नी यांच्या उत्पन्नामध्ये असणारी तफावत, पत्नीला शिक्षणाप्रमाणे राहणीमान ठेवण्यासाठी पोटगी देणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने डॉक्टर पत्नीला दरमहा १० हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी हा आदेश दिला आहे. तिने मिळकत व जबाबदारीचे पत्र दाखल केलेल्या तारखेपासून म्हणजे १७ मे पासून ही रक्कम द्यावी लागणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. माधव आणि माधवीचा (नावे बदलली आहेत) विवाह प्रेम आणि ठरवून फेब्रुवारी २०२१ मध्ये झाला. मार्च २०२४ पासून दोघे विभक्त राहत आहेत. पत्नीने क्रुरता व त्याग या कारणाकरिता न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या निकालास कालावधी लागणार असल्याने अॅड. भारती जागडे, अॅड. अक्षय जागडे यांच्यामार्फत दरमहा पोटगीची मागणी केली. पतीला दरमहा १ लाख २५ हजार रुपये पगार आहे. हडपसर येथे १ बीएचके फ्लॅट आणि इतर ठिकाणी बरीचशी स्थावर मालमत्ता आहे. या व्यतिरिक्त पतीचे इतर उत्पन्न असल्याचेही त्याने न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रावरून दिसून येत आहे. त्यामुळे अंतरिम पोटगी देण्याची मागणी करण्यात आली. यास माधवच्या वकिलांनी विरोध केला. ती दंत चिकित्सक आहे. तिला दरमहा २५ ते ३० हजार रुपये पगार आहे. तिच्या खात्यावर झालेल्या व्यवहारावरून पगारा व्यतिरिक्त उत्पन्न असल्याचेही दिसून येत आहे. त्याला दरमहा १ लाख २५ ह्जार रुपय असला, तरीही त्याचा मासिक खर्च १ लाख २४ हजार ४२० रुपये आहे. ती विमानाने प्रवास करते. नियमितपणे गोवा, केदारनाथ, हिमाचल प्रदेश, तिबेट या ठिकाणी फिरण्यासाठी जाते. राहणीमान पाहता तिला पोटगीची गरज नसल्याचा युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकुण न्यायालयाने अंतरिम पोटगीचा निकाल दिला. “न्यायालयाच्या या निर्णयामुळे पत्नीला दिलासा मिळाला आहे. उत्पन्नाच्या तफावतीवरून अंतरिम पोटगीचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.” -अॅड. भारती जागडे (पत्नीच्या वकील)