चेन्नई – तामिळनाडूला शनिवारी दित्वाह चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला आहे. या चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून रामनाथपुरम आणि नागापट्टिनम जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, नैऋत्य बंगालच्या उपसागरातील दित्वाह चक्रीवादळ आंध्र प्रदेशसह काही राज्यांना हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, दित्वाह चक्रीवादळ उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकले असून उद्या, रविवारपर्यंत उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचेल, असा अंदाज आहे. तसेच चक्रीवादळामुळे पुढील ४८ तासांत अत्यंत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त आहे. यामुळे चेन्नई विमानतळ अधिकाऱ्यांनी ५४ नियोजित उड्डाणे रद्द केली आहेत. याशिवाय तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाच्या इशाऱ्यांमुळे अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि चित्तूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. भारतातील चक्रीवादळांचा इतिहास : भारत जगातील सर्वाधिक चक्रीवादळ-प्रवण देशांपैकी एक आहे. विशेषतः बंगालचा उपसागर हा चक्रीवादळांचा हॉटस्पॉट मानला जातो. वर्षाकाठी सरासरी ५–६ चक्रीवादळे भारताच्या किनाऱ्यांना धोका निर्माण करतात. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर चक्रीवादळांची नोंद 11व्या शतकापासून आढळते. ब्रिटिश काळात बंगालमध्ये अनेक मोठ्या आपत्ती नोंदल्या गेल्या. यामध्ये “भोल चक्रीवादळ (बंगाल क्षेत्र) 1970 , ओडिशा सुपर सायक्लोन 1999, फायलिन चक्रीवादळ 2013, फणी 2019 , अम्फान 2020 , तौक्ते 2021 , मोचा 2023 असे अनेक अत्यंत तीव्र वादळ येऊन गेले आहेत. रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला : हवामान विभागाने मुसळधार पावसासह रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या वादळामुळे उत्तर भारतात हवेत गारवा निर्माण झाला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वायव्य भारतात तापमान हे २ ते ४ अंश सेल्सियसने कमी होण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये थंडीची लाट येत आहे.