चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या जिल्हा दौरा

सातारा – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार, दि. 4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सातारा व कराडमध्ये विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
आ. गोरे म्हणाले, “महाविजय 2024 संकल्प’ दौऱ्यासाठी आ. बावनकुळे हे दि. 4 रोजी येणार आहेत. वाई येथे सकाळी 10 वाजता त्यांचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर बावधन बगाडाला भेट देऊन, ते सातारा शहरात येणार आहेत. शहरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असून, त्यानंतर 300 मीटर पदयात्रा होणार आहे. यात ते प्रतिष्ठित व्यक्तींची भेट घेणार आहेत.
त्यांच्यासोबत खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, धैर्यशील कदम, माजी आमदार मदन भोसले, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे आणि माझ्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तीन विधानसभा मतदारसंघांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची साताऱ्यात बैठक होणार आहे. त्यानंतर आ. बावनकुळे हे कराडला जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिशा देणारे आणि युवकांचे भविष्य बदलणारे निर्णय घेतले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भाजप महाविजयाची तयारी करत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात 2024 चा खासदार भाजपचाच होणार आहे. धैर्यशील कदम म्हणाले, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सकाळी 11 वाजता कनिष्क मंगल कार्यालयात सातारा, कोरेगाव आणि वाई मतदारसंघाची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर यशोदा शिक्षण संस्थेच्या कॉलेजला भेट देणार आहेत.
त्यानंतर मोती चौक ते जुना मोटार स्टॅंड अशी पदयात्रा होणार आहे. यात महिला योजना, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जुना मोटार स्टॅंड येथे ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर कराड येथे वेणूताई चव्हाण सभागृहात कराड आणि पाटण येथील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि आझाद चौक ते चावडी चौक पदयात्रा होणार आहे. राज्यातील इतर लोकसभा मतदारसंघांमधील विजयापेक्षा सातारा लोकसभा मतदारसंघातील विजय हा महाविजय असणार आहे. जिल्ह्यात केंद्रीय मंत्र्यांचे वारंवार दौरे होत आहेत. साताऱ्यात मतदारवाढीचा भाजपचा प्रयत्न आहे. राज्य व केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघ समन्वयक सुनील काटकर, सातारा विधानसभा मतदारसंघ निवडणूकप्रमुख अविनाश कदम, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे, विकास गोसावी, धनंजय जांभळे उपस्थित होते.





