प्रभात वृत्तसेवा पुणे – इंधन दरवाढ, पशुखाद्याचे वाढलेले भाव व दूध उत्पादनात झालेली घट या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ १ ऑगस्ट पासून लागू होणार असून, ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दूधासाठी संघाकडून प्रति लिटर रु. ३३/- दराने खरेदी केली जाणार आहे. संस्थांसाठी हा दर वरकड खर्चासह रु. ३३.८०/- इतका राहणार आहे. दूध खरेदी दर वाढवण्यात आली असली तरी, संघाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे संघावर आर्थिक बोजा येणार आहे, असेही व्यवस्थापकीय संचालक मनोज गोपाळ लिमये यांनी स्पष्ट केले. संघातर्फे जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक व संस्थांना आवाहन करण्यात आले आहे की, स्वच्छ, ताजे व भेसळविरहित उच्चतम गुणवत्तेचे दूध मोठ्या प्रमाणावर संघाला पुरवठा करावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय यशस्वी होईल, असा विश्वास दूध संघाने व्यक्त केला.