सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लीम बांधवांनी “शब-ए-मेराज’ व “शब-ए-बारात’ उत्सव साधेपणाने साजरे करावेत. शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. या संदर्भात “शब-ए-मेराज’ (चंद्रदर्शनावर अवलंबून) दि. 11 ते 12 मार्च या कालावधीत व “शब-ए-बारात’ (चंद्रदर्शनावर अवलंबून) उत्सव दि. 28 ते 29 मार्च या कालावधीत सिंह यांनी आदेश जारी केले आहेत.
या उत्सवांमध्ये मुस्लीम बांधव मशिदीत रात्रभर नमाज, कुराण व दुवा पठण करतात. बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर वर्दळ असते. काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा करोना संसर्गाचा विचार करता “शब-ए-मेराज’ व “शब-ए-बारात’ या उत्सवांमध्ये मिरवणुकांचे आयोजन करू नये. मशिदीत अथवा घरात दुवा पठण करावी.
मशिदीत गर्दी होऊ नये म्हणून एकावेळी 40 ते 50 व्यक्तींनी सामाजिक अंतराचे पालन व मास्कचा वापर करून दुवा पठण करावे. मशिदीतील व्यवस्थापकांनी आजूबाजूच्या परिसराचे निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियमांचे (मास्क, सॅनिटायझर वापर) पालन होईल, याकडे लक्ष द्यावे. या उत्सवांमध्ये शक्यतो बंदिस्त जागेत कार्यक्रमाचे आयोजन करावे.
खुल्या जागेत आयोजन केल्यास सामाजिक अंतराचे पालन करावे. वाझ कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रमाची सुविधा केबल नेटवर्क, सोशल मीडियावर उपलब्ध करुन द्यावी. या आदेशांच्या अंमलबजावणीस टाळाटाळ अथवा विरोध केल्यास संबंधितांवर दंडनीय व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद केले आहे.