जामखेड : रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य वाटप केले जात असते. या महिन्यात वाटप करण्यात आलेल्या धान्यात ज्वारीचा देखील समावेश आहे. मात्र हि ज्वारी निकृष्ट दर्जाची असल्याने नेमकी ही ज्वारी माणसासाठी खायची आहे का जनावरांसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात येत असलेल्या धान्यात चालू महिन्यात ज्वारीचे देखील वाटप करण्यात आले आहे. दरम्यान नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शासकीय स्वस्त धान्य दुकानात बीपीएल, एपीएल धारक गोरगरीब लाभार्थ्यांना निकृष्ठ दर्जाची ज्वारी वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सध्यस्थिती जामखेड शहरामध्ये व तालुक्यात सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून पुरवण्यात आलेल्या धान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्यातील ज्वारी हे धान्य अत्यंत निकृष्ट प्रतीचे असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनुर लागलेले असून त्यातील ज्वारी ही काळपट आहे. तसेच सदरील ज्वारीचा मोठय़ा प्रमाणावर उग्र स्वरुपाचा वास येत असतो. त्यामुळे सदरील ज्वारी ही खाण्याचे लायक नसूनसुद्धा ती स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येत आहे. सदरील निकृष्ट प्रतीचे धान्य वाटप करून शासन एक प्रकारे जनतेच्या जिवाशी खेळत आहेत. याबाबत संबधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे विचारपूस व तक्रार केली असता ते सांगता की यात आमचा काहीही दोष नसून आम्हास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून तसेच धान्य येते. ते आम्ही वाटप करीत असतो. त्यामुळे यात आम्ही काहीच बदल करू शकत नाही. मात्र ही ज्वारी माणसासाठी खायची लायकीची नसुन ती जनावरांसाठी खाण्याच्या लायकीची आहे.