कॉम्पिटिटर्स फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना लॅपटाॅप वाटप

पुणे – कॉम्पिटिटर्स फाउंडेशन सेवाभावी संस्थेमार्फत महाराष्ट्रातील विविध भागात शिक्षण घेत असलेल्या गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्ययनासाठी लॅपटॉप प्रदान कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार भोसले हे होते.
प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे सायबर सेक्युरिटी सेलचे उपमहानिरीक्षक हरीष बैजल सर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले ,” आपण सर्वांनी नेहमीच वेळेच बंधन पाळले पाहिजे, काटेकोरपणे नियोजन केले तर जिवनात हमखास यश मिळते .केवळ वरवरचे शिक्षण नको ,प्रत्यक्ष वस्तू हाताळल्याने ज्ञानाचे दृढीकरण उत्तम होते .कोरोना प्रभावित सद्यस्थितीत शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप उपयुक्त ठरतील .आपण प्रशासनात काम करताना जबाबदारीने काम करु अन हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मदत करून स्वयंपूर्ण बनवू .विद्यार्थी उत्तम अभ्यास करून प्रशासनातही येतील .आपण कितीही मोठ्या पदावर कार्यरत असू पण आपण आपल्यातील ‘बाळ ‘ कधीही विसरू नये .”
ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांचेही ओघवते मार्गदर्शन यावेळी झाले .यावेळी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ कायदेतज्ञ् रवी अडसुरे , आय.ए.एस. प्रमोद यादव साहेब , भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा जाडकर, उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनील चव्हाण ,आयआरबीचे जनरल मॅनेजर रवींद्र वायाळ यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी दहा गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आणि पाच सेवाभावी शैक्षणिक संस्थांना असे एकूण पंधरा लॅपटॉप उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले .लवकरच उत्तर महाराष्ट्र , विदर्भ व मराठवाड्यातील पन्नास गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्यात येतील .
२०१५ ला जयकर परिवारातील राज्याच्या प्रशासनात कार्यरत अधिकाऱ्यांनी एकत्र येत कॉम्पिटिटर्स फाउंडेशन ची स्थापना करून तत्कालीन गरजेनुसार काम केले आहे . राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे म्हणून शेकडो सायकल वाटप केले आहे .
नांदेड याठिकाणी एमपीएससी व यूपीएससी मार्गदर्शन वर्ग सुरू करून वेगळा आदर्श निर्माण केला.पर्यावरण संतुलनासाठी पाच हजार आंबा व नारळाची रोपे दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात लावली .सांगली व कोल्हापूर येथे हजारो महापूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य मदत करून उत्तम सामाजिकता जपली .
आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात रुग्णवाहिका भेट देऊन सामाजिक जाण व भान जपले आहे .तर चालू वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत हजारो गरजूंना जीवनावश्यक साहित्य भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोज देवने यांनी , सुत्रसंचालन संदीप भुजबळ यांनी तर आभार प्रशांत वाडकर यांनी मानले.





