राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेतर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

तळेगाव दिघे -लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबांना हाताला काम व उत्पन्न नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासन व अनेक स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न करीत आहे.राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेने संगमनेरमधील गावांमध्ये विधवा, परितक्त्या, अपंग व हातावर पोट असलेल्या गरजू कुटुंबांचा सर्वे करून त्यातील कुटुंबांना मागील आठ दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे.
यामध्ये खाद्यतेल, मूगडाळ, तूरडाळ, बेसन पीठ, गूळ, शेंगादाने, मठ, हळद, मीठ, मिरची पावडर, डेटॉल साबण आदी वस्तूंचा समावेश आहे. संगमनेर तालुक्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याबरोबर योग्य प्रकारे समन्वय ठेऊन गरजू कुटुंबांपर्यंत ही मदत पोहचविण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाळंदे यांनी या उपक्रमासाठी निधी संकलन केले.
संस्थेचे सचिव डॉ. दिवेकर यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची करोनापासून काळजी कशी घ्यावी तसेच ग्रामीण भागातील लोकांना करोनाबद्दल कशा प्रकारे जागृत करावे, या विषयी माहिती दिली. संस्थेचे कार्यकर्ते प्रदिप दारोळे, मंगल कदम, मंगल काळे, योगेश नवले, अजित सोर, मुक्ता गिरी, संजय नवले, अमोल मगर, दशरथ गुंजाळ यांनी प्रशासनाने दिलेल्या प्रशासकीय सूचनांचे पालन करून गरजू कुटुंबांपर्यंत या जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी प्रयत्न केले.





