Lok Sabha Election Symbols : प्रकाश आंबेडकर, महादेव जानकर यांना निवडणूक चिन्हांचे वाटप, कोणाला कोणतं चिन्हं मिळालं पहा

Lok Sabha Election Symbols : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मतदान चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार, रासप नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना शिट्टी हे निवडणुक चिन्ह मिळालं आहे तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना प्रेशर कुकर हे निवडणुक चिन्ह मिळालं आहे.
जानकरांना पहिल्याच पसंतीचे चिन्ह –
महादेव जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे पहिल्या पसंतीचं चिन्ह म्हणून शिट्टी हे चिन्ह मागितलं होतं. तर दुसऱ्या पसंतीचे चिन्ह म्हणून सफरचंद या चिन्हाची मागणी केली होती. तर, रोड रोलर या चिन्हाला तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिली होती, निवडणुक विभागाने महादेव जानकर यांना पहिल्या पसंतीचं शिट्टी हे चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आता महादेव जानकर शिट्टी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचं शिट्टी हे चिन्ह असणार असून आता गावागावात शिट्टीचा निनाद घुमणार आहे.
वंचित बहुजन आघाडीला लकी ड्रा पद्धतीने मिळाले चिन्ह –
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि इंडियन नॅशनल लीगचे उमेदवार नजीब शेख यांनी गॅस सिलेंडर चिन्हाची मागणी केली होती. मात्र लकी ड्रॉ पद्धतीने नजीब शेख यांना गॅस सिलेंडर चिन्ह तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला प्रेशर कुकर ही निशाणी मिळाली आहे.





