जि. प. अध्यक्षपदी संजीवराजे, राजेश पवार, उदय कबुले की मनोज पवार?

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी उद्या विशेष सभा; उपाध्यक्षपदासाठीही रस्सीखेच
सातारा – राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील व शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांची वर्णी लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर बुधवारी (दि. 1 जानेवारी) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी होणार आहेत. नवीन समीकरणानुसार अध्यक्षपद पुन्हा संजीवराजे यांना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार यांना अध्यक्षपदी बढती देऊन पाटण तालुक्यात राष्ट्रवादीला बळकटी देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मंत्रिमंडळातून आ. मकरंद पाटील यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या मतदारसंघातील कृषी समितीचे सभापती मनोज पवार किंवा उदय कबुले यांनाही अध्यक्षपद देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. उपाध्यक्षपदासाठीही रस्सीखेच आहे.
राष्ट्रवादीने पहिल्या अडीच वर्षांसाठी संजीवराजे नाईक निंबाळकर यांना अध्यक्षपद तर वसंतराव मानकुमरे यांना उपाध्यक्षपद दिले. सद्य स्थितीत मात्र पक्षाला समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने पदासाठी रस्सीखेच आहे. संजीवराजे यांना पुन्हा संधी द्यावी, असा सूर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या बैठकीत निघाला होता. मसूरचे मानसिंगराव जगदाळे, मायणीचे सुरेंद्र गुदगे, कुडाळचे दीपक पवार यांनीही अध्यक्षपदाची अपेक्षा व्यक्त केली होती.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारात बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांना स्थान मिळाले आहे. त्यामुळे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद निवडीत कराड तालुक्याला संधी मिळेल, असे वाटत नाही. शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळाल्याने पाटण तालुक्यात राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता असून राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी राजेश पवार यांना अध्यक्षपदी बढती देऊन पाटणकर गटाला बळकटी देण्याचा प्रयत्न शरद पवार करतील, अशी शक्यताही आहे.
राजेश पवार यांचा विचार न झाल्यास आ. मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खंडाळ्याचे मनोज पवार व उदय कबुले यांनाही अध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात जिथे राष्ट्रवादी कमकुवत असेल तिथे पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न होईल. उपाध्यक्षपदासाठी कुडाळचे सदस्य दीपक पवार यांना संधी मिळेल, असे बोलले जात आहे. अध्यक्षपद कराड व पाटण सोडून अन्य तालुक्यात दिले तर उपाध्यक्षपद मसूरचे मानसिंगराव जगदाळे किंवा पाटणचे राजेश पवार यांना मिळण्याचे संकेत आहेत.
निवडीचा कार्यक्रम
अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी बुधवारी (दि. 1 जानेवारी) जिल्हा परिषदेत विशेष सभा होणार आहे. सकाळी 10 ते 12 या वेळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्याकडे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात येणार आहेत. दुपारी 2 वाजता विशेष सभा होणार असून नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. दुपारी 2.20 ते 2.30 या वेळेत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. आवश्यकता भासल्यास दुपारी 2.30 वाजता मतदान घेण्यात येणार आहे.





