वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरात गुरुवारी (दि.10) सकाळी नऊ वाजल्यापासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने दुपारपर्यंत सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तालुक्याचे गाव असल्याने वडगाव शहरात तहसील कार्यालय,न्यायालय, भूमिअभिलेख, पंचायत समिती, दुय्यम निबंधक कार्यालयात, नोंदणी कार्यालय, पोलीस ठाणे, कृषी विभाग आदी सर्व महत्वाच्या विभागांची शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत तसेच वडगाव शहरात गुरुवारी आठवडे बाजार देखील असल्याने अनेक नागरिक शासकीय कार्यालयातील कामकाज व आठवडे बाजार यांची सांगड घालून गुरुवारी वडगाव येथे येत असतात. मात्र मागील काही आठवड्यांपासून महावितरणकडून गुरुवारचा संपूर्ण दिवस वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून आहे. गुरुवारी सकाळपासूनच महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दुपारी दुय्यम निबंधक कार्यालयाचा बॅटरी बॅकअप संपल्याने दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व काम दुपारीच बंद पडले. यामुळे तालुक्यातील तसेच मुंबई पुणे इतरत्र ठिकाणाहून दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना दस्त नोंदणी न करताच माघारी जावे लागले. तसेच वीज पुरवठा खंडित झाल्याने न्यायालयाच्या, नागरीसुविधा केंद्र तहसील कार्यालय बँका यांच्या कामकाजात देखील अडथळा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. महावितरण कडून गुरुवारी मेंटेनस् साठी विद्युत पुरवठा खंडित केला जात असला तरी आठवड्यातील इतर दिवस पूर्णवेळ विद्युत पुरवठा केला जात नाही वडगाव शहरात दररोज अनियमित विद्युत पुरवठा होत असून विद्युत पुरवठा कधी खंडित होईल याचा काही नेम नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर येथील वायरमन किंवा महावितरण कार्यालयातील कोणतेही अधिकारी नागरिकांचे फोन घेत नाहीत. त्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा कधी सुरळीत होईल याची माहिती देखील महावितरणकडून नागरिकांना दिली जात नाही. मोर्च, आंदोलना परिणाम नाही वडगाव शहरात मागील अनेक महिन्यांपासून अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झालेले आहेत. या संदर्भात महावितरण कार्यालयावर अनेकदा मोर्चे आंदोलने झाली तरी देखील त्याचा काहीच परिणाम महावितरण वर झालेला नाही.