दौऱ्यात विघ्न! राज ठाकरेंच्या ताफ्याला घोडेगावनंतर वाळूजमध्ये दुसऱ्यांदा अपघात

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात विघ्न येताना दिसत आहेत. आधी सभेसाठी परवानगीचा मुद्दा गाजला होता. आता राज यांच्या ताफ्याला सलग दुसऱ्यांदा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
राज यांच्या ताफ्यातील मागील तीन गाड्या घोडेगाव येथे असताना ऐकमेकांना धडकल्या होत्या. या अपघातामध्ये अभिनेते केदार शिंदे, अंकुश चौधरी यांच्या गाड्या ऐकमेकांना धडकून बोनटचं नुकसान झालं होतं. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हतं.
दरम्यान घोडेगावनंतर राज यांच्या ताफ्याला औरंगाबादजवळ असलेल्या वाळुज येथे अपघात झाल्याचं समोर आलं आहे. पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळाली. या अपघातात १२ गाड्यांचं नुकसान झालं आहे.
दौऱ्यातील अपघाताच्या मालिकेदरम्यान राज ठाकरे औरंगाबादमध्ये सुखरूप दाखल झाले आहेत. उद्या राज यांनी औरंगाबादेत बहुचर्चित सभा होणार आहे.





