शिक्रापूर/कोरेगाव भीमा -शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. पुणे-नगर महामार्गावरील मोठी लोकसंख्या असलेल्या कोरेगाव भीमा गावात गुरुवारी (दि. 28) करोनाचा रुग्ण आढळून आला आहे.
कोरेगावातील एका व्यक्तीला रविवारी (दि. 24) श्वसनाचा त्रास झाल्याने त्यास एका खासगी रुग्णालयात व त्यांनतर तेथून वाघोलीतील खासगी रुग्णालयात ऍडमीट करण्यात आले होते. तर मंगळवारी (दि. 26) त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. दरम्यान, त्याचे स्वॅब घेण्यात आले होते, त्याचा अहवाल गुरुवारी (दि. 28) पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे.
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. विराज भंडलकर, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्व्हे करण्यास प्रारंभ केला आहे. तर कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच प्रकाश ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी गाव निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तर तलाठी अश्विनी कोकाटे, पोलीस पाटील मालन गव्हाणे यांनी परिसराची पाहणी करुन गावातील व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
संचारबंदीचा फज्जा
संचारबंदीच्या काळातही नागरिकांनी पोलिसांना कलम 144 ची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार सूचना करुनही गांभीर्याने घेतले नाही. तर गावामध्ये मुंबई पुण्यासह इतर भागातून 300 पेक्षा अधिक लोक खुलेआम आले असून त्यातील मोजक्याच लोकांना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील 8 ते 10 गावातील नागरिक गावात दररोज येत असल्याने गावात संचारबंदीचा फज्जा उडाला आहे.